नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी भागात लाच घेताना सरपंचाच्या वडिलासह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:05 PM2017-12-16T23:05:30+5:302017-12-16T23:10:13+5:30
पांदण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केल्यानंतर बिलापोटी प्राप्त झालेल्या रकमेतून काम मिळवून दिल्याची बतावणी करीत ४० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने अटक केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : पांदण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केल्यानंतर बिलापोटी प्राप्त झालेल्या रकमेतून काम मिळवून दिल्याची बतावणी करीत ४० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने अटक केली. यातील एका आरोपीचा शोध सुरू असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ग्रामसेवक व सरपंचाच्या वडिलांचा समावेश असून, फरार आरोपीमध्ये सरपंचाचा समावेश असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई पारशिवनी तालुक्यातील आमगाव येथे शनिवारी दुपारी करण्यात आली.
हरीष तुकाराम आकरे (ग्रामसेवक) व मारोतराव बावनकुळे (सरपंचाचे वडील) अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोर आरोपींची नावे असून, आशिष मारोतराव बानवकुळे (सरपंच) असे फरार आरोपीचे नाव आहे. बाभूळवाडा ग्रटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आमगाव येथील पांदण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. या कामाच्या बिलापोटी फिर्यादी कंत्राटदारास (रा. आमगाव, ता. पारशिवनी) २ लाख ९३ हजार ६७४ रुपयांचा धनादेश (चेक) देण्यात आला. सदर काम मिळवून दिल्यामुळे सरपंच आशिष बावनकुळे व त्याच्या वडिलांना प्रत्येकी १० टक्के आणि ग्रामसेवक हरीश आकरे याला पाच टक्के रक्कम देण्याची मागणी आरोपींनी फिर्यादीस केली. ही रक्कम ४० हजार रुपये होते. मात्र, ही रक्कम देण्याची फिर्यादीची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने या संदर्भात एसीबीच्या नागपूर कार्यालयात रीतसर तक्रार नोंदविली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला या तक्रारीची शहानिशा केली आणि त्यात तथ्य आढळून येताच सापळा रचला. ठरल्याप्रमाणे फिर्यादीने आशिष बावनकुळे, मारोतराव बावनकुळे व हरीश आकरे या तिघांना एकूण ४० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी तिघांनाही आमगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात बोलावले. मारोतराव बावनकुळे व हरीश आकरे या दोघांनी सदर रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली. आशिष बावनकुळे तिथे न आल्याने त्याला अटक करण्यात आली नाही.
या प्रकरणी पारशिवनी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात एसीबी पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, सुनील कळंबे, रवी डहाट, मंगेश कळंबे, गजानन गाडगे, सरोज बुधे, परसराम साही, शिशुपाल वानखेडे यांच्या पथकाने केली.