लाच घेताना सह दुय्यम निबंधक अडकली
By Admin | Published: August 10, 2016 02:16 AM2016-08-10T02:16:03+5:302016-08-10T02:16:03+5:30
आरएल (रिलिज लेटर) नसलेल्या भूखंडाचे विक्रीपत्र करून देण्याच्या बदल्यात आठ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या एका महिला सह दुय्यम निबंधकास ...
आरएल नसतानाही विक्रीपत्र : आठ हजार स्वीकारले
नागपूर : आरएल (रिलिज लेटर) नसलेल्या भूखंडाचे विक्रीपत्र करून देण्याच्या बदल्यात आठ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या एका महिला सह दुय्यम निबंधकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. मंगळवारी सायंकाळी सक्करदरा परिसरात ही कारवाई झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.
शोभा सुरेश अत्रे (वय ५१) असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या सक्करदऱ्यातील दुय्यम निबंधक कार्यालय - ५ मध्ये कार्यरत आहे. त्यांना एसीबीच्या सापळ्यात पोहचविणारा एक अर्जनवीस आहे.
एका व्यक्तीने खरेदी केलेल्या भूखंडाचे विक्रीपत्र करून घेण्यासाठी तक्रारकर्त्याने अत्रे यांच्या कार्यालयात संबंधित कागदपत्रे सादर केली. त्यात भूखंडाचे नियमितीकरण दर्शविणारे पत्र (आर. एल.) नव्हते. त्यामुळे अत्रे यांनी विक्रीपत्राची ही केस अडवून ठेवली. त्यामुळे तक्रारकर्त्या अर्जनवीसने अत्रे यांच्याशी संपर्क साधला. आरएल नसल्यामुळे विक्रीपत्र होणार नाही,असे अत्रे यांनी अर्जनवीसला सांगितले. विना आरएलने विक्रीपत्र करून हवे असेल तर १० हजार रुपये लाच द्यावी लागेल, असेही सांगितले. तक्रारकर्त्याने घासाघिस केल्यानंतर ८ हजाराच्या लाचेत विक्रीपत्र करून देण्याची तयारी अत्रे यांनी दाखवली.
दरम्यान, लाच द्यायची नसल्याने तक्रारकर्त्याने थेट एसीबीचे अधीक्षक संजय दराडे यांची भेट घेतली. त्यांनी तक्रार लिहून घेतल्यानंतर शहानिशा करण्याचे आदेश दिले. पंचासमक्ष अत्रे यांनी लाच दिल्यास रजिस्ट्री करून देतो, असे म्हटले. त्यामुळे अधीक्षक दराडे यांनी सापळा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी, पोलीस निरीक्षक भावना धुमाळे, रणजित गवई, चंद्रशेखर ढोक, परसराम साही यांच्या पथकाने तक्रारकर्त्यांच्या हातात लाचेची रक्कम दिली. सायंकाळी ६ च्या सुमारास अत्रे यांनी ही लाच स्वीकारताच उपरोक्त अधिकारी, कर्मचाऱ्यानी अत्रे यांना त्यांच्या कार्यालयातच जेरबंद केले. या कारवाईमुळे कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. अत्रे यांच्याविरुद्ध सक्करदरा ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.(प्रतिनिधी)
एसीबीची हॅट्ट्रिक
एसीबी नागपूर युनिटने आज मंगळवारी एकाच दिवशी गडचिरोली येथे पोलीस हवालदार, भंडारा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि नागपुरात सह दुय्यम निबंधक अशा तिघांना लाच घेताना पकडून हॅट्ट्रिक केली.