कुजबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:10 AM2021-08-26T04:10:29+5:302021-08-26T04:10:29+5:30
लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यानंतर नागपूर शहरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्या माध्यमातून स्वत:चा प्रचार करण्याचीच चढाओढ होती. लसींच्या संख्येपेक्षा पोस्टर्सची संख्या ...
लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यानंतर नागपूर शहरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्या माध्यमातून स्वत:चा प्रचार करण्याचीच चढाओढ होती. लसींच्या संख्येपेक्षा पोस्टर्सची संख्या जास्त दिसून येत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. मात्र म्हणतात ना दुनिया गोल है... आता काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील लसीकरणातून पक्ष व वैयक्तिक प्रचाराला सुरुवात केली आहे. महापारेषण कंपनीने दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या सीएसआर निधीतून विदर्भातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना लसीकरणासाठी तब्बल २०० वाहने ‘सद्भावना जीवनरथ’ उपलब्ध करून दिले. संबंधित निधी महापारेषणचा असल्याने यात संपूर्ण विभागाला श्रेय जाणे अपेक्षित होते. मात्र नितीन राऊत यांनी ट्विट करून ‘मी’ पुढाकार घेतल्याचे प्रामुख्याने नमूद केले. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित वाहनांवर लसीकरणाच्या माहितीपेक्षा मंत्रिमहोदयांच्या छायाचित्रानेच जास्त जागा व्यापली आहे. त्यामुळेच ही लसीकरण की प्रचार मोहीम आहे, असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.