जीवनदायीच्या कक्षेत ‘पांढरे कार्ड’
By Admin | Published: May 17, 2015 02:59 AM2015-05-17T02:59:42+5:302015-05-17T02:59:42+5:30
गंभीर आजार आणि त्याच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्ण म्हणजे केशरी व पिवळे रेशन कार्डधारकांसाठीच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना होती.
सुमेध वाघमारे नागपूर
गंभीर आजार आणि त्याच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्ण म्हणजे केशरी व पिवळे रेशन कार्डधारकांसाठीच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना होती. गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या या योजनेचा फायदा आता श्रीमंतांना म्हणजेच पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही होणार आहे. यात ० ते १८ वयोगटातील मुले लाभार्थी ठरतील. नव्या योजनेत १०४ प्रकारच्या शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमधील रुग्णालयांसोबतच नुकताच हा सामंजस्य करार झाला असून, ही योजना लवकरच राज्यात लागू होणार आहे.
दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) व दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) नागरिकांच्या जटील आजारांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. या योजनेत जटील शस्त्रक्रियांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येते. यात ३० प्रमुख शस्त्रक्रियांसह तब्बल ९७२ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. ही योजना पांढऱ्या रेशन कार्डधारकांसाठी नव्हती. परंतु लहान मुलांमध्ये वाढते गंभीर आजार लक्षात घेऊन, ही योजना आता व्यापक करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत.