नागपुरातील रेल्वेने बांधलेली इमारत ठरतेय पांढरा हत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:05 AM2018-08-18T11:05:16+5:302018-08-18T11:11:53+5:30
नागपूर रेल्वे रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना मुक्कामी राहण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्चून रुग्णालयाच्या शेजारीच इमारत उभी केली. परंतु मागील तीन वर्षात एकाही रुग्णाच्या नातेवाईकांना या इमारतीचा लाभ झाला नाही.
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे रुग्णालयात हजारो कर्मचारी उपचार घेतात. यातील असंख्य कर्मचाऱ्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागते. त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांना मुक्कामी राहण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्चून रुग्णालयाच्या शेजारीच इमारत उभी केली. परंतु मागील तीन वर्षात एकाही रुग्णाच्या नातेवाईकांना या इमारतीचा लाभ झाला नाही. रेल्वेच्या या नियोजनशून्य कारभारामुळे लाखो रुपये पाण्यात जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांनाही व्हरांड्यात झोपण्याची पाळी येत आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय कार्यालयाच्या शेजारी रेल्वे रुग्णालय आहे. या रुग्णालयात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचारी आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील १७ हजार रेल्वे कर्मचारी उपचार घेतात. अनेकदा गंभीर रुग्णांना रुग्णालयात भरती व्हावे लागते. अशावेळी त्यांच्या देखभालीसाठी असलेल्या नातेवाईकांना रुग्णालयात थांबता येत नसल्यामुळे त्यांची पंचाईत होते. त्यामुळे तत्कालीन ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांच्या कार्यकाळात या रेल्वे रुग्णालयाच्या शेजारी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी एक निवारा बांधण्याची योजना आखण्यात आली. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने जवळपास ५० लाख रुपये खर्च करून एक इमारत बांधली.
या इमारतीत केवळ ४० रुपये शुल्क घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्याची व्यवस्था करण्याचे ठरले. या इमारतीचे २०१५ मध्ये मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक एस. के. सुद यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले. परंतु उद्घाटनापासून एकाही रुग्णाच्या नातेवाईकाला या इमारतीचा लाभ झालेला नाही. यामुळे रेल्वेचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन या इमारतीपासून मिळणारा महसूलही मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे ही इमारत बांधण्याचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून या इमारतीचा खर्च वसूल करण्याची मागणी रेल्वेचे कर्मचारी करीत आहेत.
नातेवाईकांना देत नाहीत माहिती
रेल्वे रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रात्री व्हरांड्यात झोपण्याची पाळी येते. अशावेळी ड्युटीवरील रेल्वे कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्यासाठी वाजवी दरात मुक्कामाची व्यवस्था असल्याची माहिती देत नाहीत. रुग्णालयात अशी व्यवस्था असलेले फलकही रेल्वे प्रशासनाने लावलेले नाही. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक त्यांच्यासाठीच सुरू केलेल्या सुविधेपासून मागील तीन वर्षांपासून वंचित आहेत.
प्रशासनाला वाटते डोकेदुखी
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बांधण्यात आलेली इमारत सुरू केली तर त्यासाठी वेगळे रजिस्टर करून त्यात नातेवाईकांची नोंद करणे, त्यांच्याकडून पैसे घेऊन त्याचा हिशेब ठेवणे ही रेल्वे प्रशासनाला डोकेदुखी वाटत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. याशिवाय या इमारतीत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना तैनात करावे लागणार असल्यामुळे मनुष्यबळ वाचविण्यासाठी प्रशासनाने आजपर्यंत ही इमारत खुलीच केली नाही.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
‘मागील तीन वर्षात रेल्वेने रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बांधलेल्या इमारतीचा कुणालाच लाभ झाला नाही. यामुळे रेल्वे प्रशासनाचे लाखोचे नुकसान होऊन ही इमारत बंद असल्यामुळे रेल्वेच्या महसुलाचेही नुकसान होत आहे. गरज नव्हती तर ही इमारत उभी का केली हा प्रश्न आहे. त्यामुळे ही इमारत उभी करण्याचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.’
-वीरेंद्र सिंह, विभागीय अध्यक्ष,
सेंट्रल रेल्वे मजदूर संघ