विसर्जन कुंड ठरतोय पांढरा हत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:09 AM2021-09-21T04:09:48+5:302021-09-21T04:09:48+5:30
दिनकर ठवळे कोराडी : राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून कोराडी येथील वीज केंद्राला पाणी पुरविणाऱ्या मोठ्या संग्रहण तलावाचे प्रदूषण ...
दिनकर ठवळे
कोराडी : राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून कोराडी येथील वीज केंद्राला पाणी पुरविणाऱ्या मोठ्या संग्रहण तलावाचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. तलावातील कचरा, दूषित पाणी, निर्माल्य याचे प्रमाण कमी करून, तलावाचे प्रदूषण थांबविणे, पाण्यातील जैविक संसाधनाचा विकास करणे, पर्यटनाचा विकास करणे या हितकारी योजनेनुसार केंद्र सरकारचा ६० टक्के तर राज्य सरकारच्या ४० टक्के निधीतून येथील तलावाला ५ सांडपाणी प्रक्रिया केंद्रे, एक भव्य विसर्जन कुंड व निर्माल्य व्यवस्थापनासाठी निर्माल्य प्रक्रिया केंद्रांचे काम युद्ध स्तरावर सुरू असून, यातील एक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. इतर सांडपाणी प्रक्रिया केंद्र पुढील चार महिन्यांत सुरू होतील, तसेच जवळपास एक वर्षापासून उपयोगासाठी तयार असलेल्या विसर्जन कुंड आजही पांढरा हत्ती बनून राहिला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून, हा विसर्जन कुंड तयार करण्यात आला. या वर्षी या विसर्जन कुंडाचा वापर होईल, असे अपेक्षित होते. नांदा कोराडीच्या टी पॉइंटला तलावाला लागून असलेला हा विसर्जन कुंड ४० मीटर लांब, अकरा मीटर रुंद, तर पाच मीटर पाणी साचून राहील, अशा पद्धतीने बांधण्यात आलेला आहे. भाविकांना मूर्तीचे विसर्जन करता यावे, यासाठी १८ ठिकाणी छोटे दरवाजे तयार करण्यात आले आहे. त्यालाच लागून पार्किंग व्यवस्था, सुंदर बगीच्या, फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक आदी कामे पूर्ण झाली आहेत. केवळ हस्तांतरासाठी हा प्रकल्प रखडला असून, आज त्याचा उपयोग शून्य आहे.
कोराडी, महादुला, नांदा, लोनखैरी, चिचोली, खापरखेडा, सावनेर, वारेगाव, सुरादेवी या ग्रामीण भागासह नागपूर शहराचा मोठा भाग गणेश, दुर्गा व इतर देवतांच्या विसर्जनासाठी या ठिकाणांचा वापर करतात. विशेष म्हणजे नागपूरच्या राजाचे विसर्जन येथेच होते. या तलावाचे प्रदूषण वाचावे, म्हणून हा विसर्जन कुंड तयार करण्यात आला. नागपूर महानगर विकास प्राधिकरण यांच्यामार्फत ही कामे पूर्ण केली जात असली, तरी या कामांमध्ये राज्य शासनाच्या वतीने आर्थिक वाटा महानिर्मितीने उचलला आहे. विसर्जन कुंडाचे काम पूर्ण झाले असले, तरी केवळ ग्रामपंचायतला हस्तांतरणाची प्रक्रिया व्हावयाची आहे. महानिर्मिती तिच्या वतीने कोराडी ग्रामपंचायतीला सहा महिन्यांपूर्वीच हस्तांतरणासाठी पत्र देण्यात आले आहे, परंतु याबाबत इतर माहिती पुरविण्यात आली नाही. हे काम किती खर्चाची आहे, त्यातील किती निधी खर्च झाला, कोणकोणत्या बाबी पूर्ण झाल्या, याची विस्तृत माहिती ग्रामपंचायतला अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, अशी माहिती सरपंच नरेंद्र धानोले यांनी दिली. हस्तांतरण न झाल्याने आजही या गार्डन व विसर्जन कुंडाचा वापर केल्या जात नाही. त्यामुळे या वर्षीही मोठ्या प्रमाणात निर्माल्य व गणेशजींच्या मूर्तींचे विसर्जन तलावात करण्यात आले. पर्यावरणप्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे, तसेच कोराडी देवी मंदिराच्या सुरादेवीकडील भागात याच प्रकल्पांतर्गत निर्माल्य व तलावातील कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हाही प्रकल्प असाच पांढरा हत्ती म्हणून पडला आहे. या संदर्भात महानिर्मितीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची हस्तांतराची प्रकल्प प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यासाठी नागपूर महानगर विकास प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून हस्तांतरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण करू, असे सांगण्यात आले आहे.