नागपूर जिल्ह्यातील खापरखेडात सांबारमध्ये आढळल्या पांढऱ्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 10:26 AM2018-03-06T10:26:08+5:302018-03-06T10:26:15+5:30
खापरखेडा तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सभा आटोपल्यानंतर नाश्ता करण्यासाठी हॉटेलमधून दोसा मागवला. त्या दोशासोबत देण्यात आलेल्या सांबारात अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फास्ट फूड आणि हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर ताव मारणे ही आता फॅशन झाली आहे. हे खाद्यपदार्थ खाताना ते खाण्यायोग्य आहे की नाही, याची पडताळणी कुणीही करीत नाही. खापरखेडा तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सभा आटोपल्यानंतर नाश्ता करण्यासाठी हॉटेलमधून दोसा मागवला. त्या दोशासोबत देण्यात आलेल्या सांबारात अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली.
चिचोली ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी मासिक सभेचे आयोजन केले होते. काही कारणास्तव ही सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर सरपंच पुरुषोत्तम चांदेकर यांनी उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांसाठी खापरखेडा येथील ‘एम्बसी’ हॉटेलमधून दोसा बोलावला. विशेष म्हणजे, हे परिसरातील नामांकित हॉटेल आहे. मात्र, या दोशासोबत पाठविण्यात आलेल्या सांबारामध्ये अळ्या असल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. सदस्यांनी हा प्रकार वेळीच हॉटेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिला. ग्रामीण भागातील बहुतांश हॉटेलमध्ये साफसफाईचा अभाव असल्याचे दिसून येते. काही हॉटेल गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. या हॉटेलची तपासणी करण्याची तसदी अन्न व औषधी प्रशासन तसेच पोलीस विभाग घेत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्यास अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने गलिच्छ हॉटेल मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.