स्मार्ट सिटीच्या अपयशाचे शिल्पकार कोण ?

By admin | Published: February 1, 2016 02:57 AM2016-02-01T02:57:40+5:302016-02-01T02:57:40+5:30

नागपूरचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला असता तर नागपुरातील भाजप नेते फेटे बांधून मिरवले असते.

Who is the architect of the failure of the smart city? | स्मार्ट सिटीच्या अपयशाचे शिल्पकार कोण ?

स्मार्ट सिटीच्या अपयशाचे शिल्पकार कोण ?

Next

विकास ठाकरे यांचा सवाल : भाजपच्या अकार्यक्षमतेचे सर्टिफिकेट मिळाले
नागपूर : नागपूरचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला असता तर नागपुरातील भाजप नेते फेटे बांधून मिरवले असते. नागपुरात हेवीवेट नेते आणि कर्तबगार अधिकारी असतानाही नंबर हुकला. एकेकाळी टॉप १० मध्ये असलेले नागपूर आता पहिल्या २० मध्येही येऊ शकले नाही. आता या अपयशाचे शिल्पकार कोण, हे महापौरांनी जाहीर करावे, अशी मागणी करीत विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला. सोबतच स्मार्ट सिटी करताना जनतेवर किती कर लादल्या जाणार आहे हे आधी जाहीर करावे व त्यानंतर जनमत घेऊनच सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
स्मार्ट सिटीत नागपूरचा नंबर हुकल्यावरून ठाकरे यांनी पत्रकार परिषद धेत सत्ताधाऱ्यांवर नेम साधला. ठाकरे म्हणाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दोन हेवीवेट नेते नागपुरातील आहेत. त्यामुळे नागपूरचा नंबर लागेल अशी अपेक्षा होती. नागपूरचा नंबर लागला असता तर महापौर प्रवीण दटके यांनी क्रेडिट घेतले असते. भाजप नेत्यांचे फेटे घातलेले होर्डिंग लागून सत्कार सोहळे झाले असते. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्वीच विरोध केला असता तर या अपयशाचे खापर आमच्यावर फोडण्यात आले असते. आता या अपयशासाठी जबाबदार कोण, केंद्र सरकारमध्ये आपसातील लढाईमुळे नागपूर कटले का, महापालिकेचा प्रस्तावच दुबळा होता का याची कारणे महापौरांनी जनतेला द्यावी. महापालिकेची विशेष सभा घेऊन तीत या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली. ठाकरे म्हणाले, गेली नऊ वर्षे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या नऊ वर्षात स्टारबस घोटाळा, पाणीपुरवठ्यात घोटाळा, कचरा घोटाळा, दहन घाट लाकूड घोटाळा, असे अनेक घोटाळे झाले. जेएनएनयुएमआर अंतर्गत महापालिकेला १९ प्रकल्प मिळाले. पण महापालिकेने एकही काम बरोबर केले नाही. केंद्राच्या पैशाचा अपव्यय करण्यात आला. अंकेक्षण अहवालात यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. कदाचित या घोटाळ्यांची दखल घेऊन नागपूरचा नंबर कटला असावा, अशी शंका व्यक्त करीत महापालिकेला नऊ वर्षातील अकार्यक्षमतेचे सर्टिफिकेट मिळाले असल्याची टीका त्यांनी केली.(प्रतिनिधी)

कर किती वाढेल ते आधी सांगा
ठाकरे म्हणाले, केंद्रीय नगर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटीसाठी अधिक कर भरावा लागेल, असे सूतोवाच केले आहे. आधीच नागपूरकर ओसीडब्ल्यूचे वाढीव पाण बिल, मालमत्ता करात झालेली वाढ, विजेचे अवास्तव बिल यामुळे त्रस्त आहेत. अशात स्मार्ट सिटीच्या नावावर नागपूरकरांवर आणखी एक कर लादला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी करण्यापूर्वी जनतेच्या खिशातील किती पैसे उकळले जातील, त्यांना किती वाढीव कर भरावा लागेल हे आधी जाहीर करावे. त्यानंतर महापालिका प्रशासनाने जनमत घ्यावे. त्यानंतरही जनता तयार असेल तरच प्रस्ताव पाठवावा, अशी मागणीही त्यांनी केली.
नासुप्र बरखास्त केल्यास कस्तूरचंद पार्कवर सत्कार
स्मार्ट सिटीच्या अपयशाचे खापर नासुप्रवर फोडणे चुकीचे आहे. प्रस्ताव महापालिकेने सादर केला होता. त्यामुळे सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची आहे. महापौर नासुप्रच्या बरखास्तीसाठी पाठपुरावा करू म्हणतात. पण आता तर भाजपचेच मुख्यमंत्री आहेत. तेतीन दिवसात नासुप्र बरखास्त करू शकतात. राज्य सरकारने खरोखरच नासुप्र बरखास्त करून दाखविली तर आपण भाजप नेत्यांचा कस्तुरचंद पार्कवर सत्कार करू, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

Web Title: Who is the architect of the failure of the smart city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.