‘रिसॉर्ट’मालकांवर आशीर्वाद कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:08 AM2021-03-19T04:08:32+5:302021-03-19T04:08:32+5:30

उमरेड : उमरेड-कऱ्हांडला पवनी अभयारण्याच्या अगदी वेशीवर असलेल्या काही रिसॉर्टवर शे-पाचशे नव्हे, तर तब्बल हजारावर वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत बेधडकपणे लग्न ...

Who blesses the resort owners? | ‘रिसॉर्ट’मालकांवर आशीर्वाद कुणाचा?

‘रिसॉर्ट’मालकांवर आशीर्वाद कुणाचा?

Next

उमरेड : उमरेड-कऱ्हांडला पवनी अभयारण्याच्या अगदी वेशीवर असलेल्या काही रिसॉर्टवर शे-पाचशे नव्हे, तर तब्बल हजारावर वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत बेधडकपणे लग्न समारंभाचा धडाका सुरू आहे. दुसरीकडे शहरातील मंगल कार्यालये, हॉल तथा लॉनवर कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाची, समारंभाची परवानगी नाही. कुलूपबंद आहेत. एकाला मायाचा, तर दुसऱ्याला मावशीचा असा भेदभाव केल्याचा आरोप करीत रिसॉर्ट मालकांवर ‘आशीर्वाद’ कुणाचा, असा सवाल विचारला जात आहे.

उमरेड तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने या विषयाकडे गंभीरपणे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. उमरेड नगरपालिका क्षेत्रात एकूण १३ कार्यालये तथा लॉन आहेत. सध्या या कार्यालय व लॉनमध्ये लग्न समारंभ तथा कोणत्याही कार्यक्रमासाठी परवानगी नाही. प्रारंभी २५ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत कार्यालये, लॉन आणि हॉल पूर्णत: बंद ठेवावी, अशा आशयाचे सूचनापत्र पालिकेने पाठविले होते. कालांतराने पुन्हा ७ ते १४ मार्चपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश निघाले. आता पुन्हा १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत कोणताही कार्यक्रम घेऊ नये. बंद ठेवावेत. घरच्या घरी केवळ ५० वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडावा, असे आदेश आहेत. बहुतांश हॉल, मंगल कार्यालये तथा लॉनवर सर्वसामान्यांचे विवाह सोहळे होतात. लग्नाची तारीख ठरल्यानंतर अनेकांनी पत्रिकाही वितरित केल्या. आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर बंदी आली. सर्वसामान्य-गोरगरिबांसह सर्वांच्याच लग्न सोहळ्याचे कार्यक्रम गडबडले. अनेकांनी घरच्या घरी लग्न उरकवले. काहींचे कार्यालय मालकांकडे अ‍ॅडव्हान्स पेमेंट शिल्लक आहेत. दुसरीकडे कार्यालये कुलूपबंद असल्याने लाखो रुपयांचा फटका मालकांना बसतो आहे. एकीकडे शहरातील विवाह सोहळे नियमावलीच्या बंधनात अडकली असून, दुसरीकडे मात्र पाचशे-हजार वऱ्हाड्यांची गर्दी कोरोना नियमावलीच्या चिंधड्या उडविणारी ठरत आहे.

कानाडोळा का?

उमरेड-कऱ्हांडला पवनी अभयारण्यालगत आठ रिसॉर्ट व एकमेव कार्यालय आहे. शहरातील कार्यालये, हॉल आणि लॉनला ‘लॉकडाऊन’मुळे लग्न समारंभ शक्य नाही. यामुळे अनेकांनी गुपचूपपणे आपला मोर्चा रिसॉर्टकडे वळविला. रिसॉर्टमालकसुद्धा या संधीचे सोने करून घेत अव्वाच्या सव्वा रक्कम सांगत सुटले आहेत. अगदी शहराबाहेर असल्याने यावर कुणाचेही नियंत्रण नाही. अधिकाऱ्यांच्या कानावर तक्रारी पोहोचल्यानंतरही याकडे हेतुपुरस्सर काणाडोळा करण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जबाबदारी कुणाची?

कोरोना महामारीने दुसऱ्यांदा डोके वर काढले. मधल्या काळात शेकडो गर्दीचे समारंभ झाले. ते केवळ उघड्या डोळ्यांनी बघण्याचेच काम झाले. कोरोनाचा उद्रेक वाढला. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशही काढले. असे असताना आता यावर नियत्रंणाची जबाबदारी कुणाची, असा सवाल विचारला जात आहे.

--

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये संबंधितांना पत्र दिले. आम्हाला कोणत्याही प्रकारे सुरक्षा नाही. आपत्ती व्यवस्थापन समितीला सांगतो. नियमावलीचा भंग होत असल्यास कारवाई करतो.

- राजेश्वर रडके, सचिव, नवेगाव साधू ग्रामपंचायत

Web Title: Who blesses the resort owners?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.