बाजार समितीचा पेट्रोल पंपाचा प्रस्ताव कोणी अडविला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:08 AM2021-05-27T04:08:17+5:302021-05-27T04:08:17+5:30
शरद मिरे भिवापूर : मार्केट यार्डातून मिळणारा सेस हेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे समितीच्या ...
शरद मिरे
भिवापूर : मार्केट यार्डातून मिळणारा सेस हेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे समितीच्या उत्पन्न वाढीकरिता शासनाने पेट्रोल पंप उभारणीची योजना आखली. त्याअंतर्गत उमरेड, मांढळमध्ये पेट्रोल पंपही उभे झाले. मात्र भिवापूरचा प्रस्ताव अद्यापही धूळखात आहे. बाजार समितीचा पेट्रोल पंप सुरू झाल्यास आपला धंदा मंदावेल अशी भीती काहींना आहे. राजकीय संबंध असलेल्या व्यापाऱ्यांनी खोडा टाकल्याने बाजार समितीचा पेट्रोल पंपाचा प्रस्ताव धूळखात पडल्याची कुजबुज समितीच्या संचालक मंडळात सुरू आहे.
पणन महासंचालनालयाने हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन कंपनीच्या संदर्भांकीत पत्रानुसार १४ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्यातील सर्व बाजार समित्यांना पत्र पाठविले. त्यात पेट्रोल पंप उभारणीकरिता इच्छुक असलेल्या बाजार समित्यांनी सदर कंपनीकडे प्रस्ताव पाठविण्याचे सूचित केले होते. मार्केट यार्डातून मिळणारा सेस वगळता उत्पन्नाचे इतर कुठलेच साधन नसल्याने राज्यातील बहुतांशी बाजार समित्यांनी पणन संचालनालयाच्या हाकेला ‘ओ’ दिला. त्यानुसार उमरेड, मांढळ, भिवापूर या तिन्ही बाजार समित्यांनी प्रस्ताव पाठविले. प्राप्त प्रस्तावावर पेट्रोलियम कंपनीने भिवापूर बाजार समितीशी संपर्क साधून जागेची पाहणी करण्याकरिता कंपनीची चमू एक दोन दिवसात येणार असल्याचे सांगितले. त्याला आता दोन वर्षाचा कालखंड उलटला आहे. मात्र ना कंपनीची चमू येथे आली, ना पेट्रोल पंपाला मंजुरी मिळाली. याऊलट पाठोपाठ प्रस्ताव पाठविणाऱ्या उमरेड व मांढळ बाजार समितीला पेट्रोल पंप मंजूर झाले. एवढेच नव्हे तर उमरेड येथे पंपाचे लोकार्पणही झाले. तर मांढळ येथे पेट्रोल पंप उभारणीचे काम सुरु आहे. यात भिवापूर येथील पेट्रोल पंप निर्मितीचा प्रस्ताव कुठे गडप झाला हा प्रश्नच आहे. राजकीय संबंध असलेल्या काही मंडळींमुळे हा प्रस्ताव धूळखात असल्याची चर्चा बाजार समितीच्या संचालक मंडळात आहे.
तर त्यांंचा धंदा मंदावेल?
शहरातील पेट्रोल पंपावरून वितरित होणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या विश्वासार्हतेवर कायम प्रश्नचिन्ह राहिले आहे. अशात बाजार समितीचा अधिकृत पेट्रोल पंप उभा झाल्यास आपल्या पेट्रोल पंपावर त्याचा परिणाम होईल. धंदाही मंदावेल या भीतीपोटी काही राजकीय संबंध असलेले व्यापारी बाजार समितीचा पेट्रोल पंप शहरात उभा होऊ नये. यासाठी प्रयत्नरत आहे. त्यासाठी थेट पेट्रोलियम कंपनीवर राजकीय दबाव टाकला जात असल्याचे समजते.
-
मुख्य मार्गावरील जागेची निवड
बाजार समितीने पेट्रोल पंपाच्या उभारणीकरिता भिवापूर-नक्षी राज्यमार्गावरील स्वमालकीच्या ९ एकर जागेपैकी ३ एकर जागेची निवड केली आहे. येथून बाजार समिती व मार्केट यार्ड अगदी जवळ आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांना हा पेट्रोल पंप सोयीचा ठरणार आहे. मार्केट यार्डात दररोज २०० वर वाहनांची रेलचेल असते. त्यामुळे पेट्रोल पंपाच्या माध्यमातून उत्पन्न वाढीची मोठी संधी बाजार समितीला आहे.
-
सेस वगळता बाजार समितीकडे उत्पन्नाचे इतर कुठले माध्यम नाही. त्यामुळे पणन महासंचालनालयाच्या सूचनेनुसार आम्ही सदर कंपनीकडे पेट्रोल पंप उभारणीबाबत प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्याला अद्याप तरी प्रतिसाद मिळालेला नाही.
- राम गोंगल, सचिव, कृ.उ.बा. समिती,भिवापूर