धूम स्टाईलला ब्रेक कुणाचा?
By admin | Published: January 13, 2016 03:27 AM2016-01-13T03:27:16+5:302016-01-13T03:27:16+5:30
अल्पवयीन मुले व मुली धूम स्टाईलने मोटरसायकली चालवित आहेत. एका फौजदारी प्रकरणावरील सुनावणीदरम्यान ...
हायकोर्टाची दखल : वाहतूक नियमांचे पालन होत नाही
नागपूर : अल्पवयीन मुले व मुली धूम स्टाईलने मोटरसायकली चालवित आहेत. एका फौजदारी प्रकरणावरील सुनावणीदरम्यान सदर मुद्दा पुढे आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी मंगळवारी या विषयावर जनहित याचिका नोंदविण्याचे निर्देश प्रबंधक कार्यालयाला दिलेत. तसेच, अॅड. श्रीरंग भांडारकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली.
मोटरसायकल चालविताना एका अल्पवयीन मुलाच्या हातून अपघात झाला होता. यामुळे अंबाझरी पोलिसांनी संबंधित मुलाविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे. अल्पवयीन मुलाविरुद्ध एफआयआर नोंदविता येत नाही असा दावा करून उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली होती. एफआयआर रद्द करण्याची विनंती याचिकेत होती. न्यायालयाने विनंती मान्य करण्यास नकार दिला. यामुळे याचिका मागे घेण्यात आली. परंतु, न्यायालयाने गांभीर्य लक्षात घेता हा विषय जनहित याचिका म्हणून जिवंत ठेवला. सध्याची अल्पवयीन मुले शैक्षणिक व अन्य उपक्रमांमुळे अत्यंत व्यस्त असतात. शाळा संपल्यानंतर शिकवणी वर्ग, खेळाचे प्रशिक्षण इत्यादीसाठी त्यांना सतत धावपळ करावी लागते. यामुळे आजकाल अल्पवयीन मुलेही कार व मोटरसायकलींचा उपयोग करतात.
अपघाताचा धोका
नागपूर : याविषयी काही नियम आहेत पण, त्याचे पालन होत नाही. अल्पवयीन मुले शक्तिशाली मोटरसायकली धूम स्टाईलने पळवितात. दरम्यान, अचानक काही परिस्थिती उद्भवल्यास त्यांना मोटरसायकल नियंत्रित करता येत नाही. यामुळे गंभीर अपघात होतात. अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध सज्ञान आरोपीप्रमाणे खटला दाखल करता येत नाही. यासंदर्भात कडक उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. (प्रतिनिधी)