नागपुरात बाहेरून येणाऱ्या ‘कोविड’ रुग्णांवर नियंत्रण कुणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:10 AM2020-07-15T11:10:39+5:302020-07-15T11:12:22+5:30
बाजूच्या राज्यातून व जिल्ह्याबाहेरुन पॉझिटिव्ह रुग्ण नागपूरच्या मेयो, मेडिकलची वाट धरीत आहे. गेल्या तीन महिन्याच्या काळात ७० वर रुग्ण जिल्हाबाहेरून आले आहेत.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाण्ी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. आवश्यक सोयी, औषध व यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, मात्र त्यानंतरही बाजूच्या राज्यातून व जिल्ह्याबाहेरुन पॉझिटिव्ह रुग्ण नागपूरच्या मेयो, मेडिकलची वाट धरीत आहे. गेल्या तीन महिन्याच्या काळात ७० वर रुग्ण जिल्हाबाहेरून आले आहेत. यातील काही लक्षणे नसलेली तर काही खूपच गंभीर अवस्थेत पाठविण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे यांच्यावरील खर्च स्थानिक प्रशासनाला करावा लागत आहे, शिवाय हा प्रवास रुग्णांसोबतच इतरांसाठी धोकादायक ठरत आहे. मात्र यावर कुणाचे नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.
कोरोनाचे संक्रमण खंडित करण्यासाठी निदान झालेल्या रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार वर्गीकृत करण्याचे ‘आयसीएमआर’ने नियम घालून दिले आहेत. त्यानुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे दाखल करण्याच्या सूचना आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या सोयी उपलब्ध आहेत. परंतु त्यानंतरही कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना तीन ते सहा तासांचा प्रवास करून नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये आणले जात आहे. हा प्रवास धोकादायक ठरत आहे.
जिल्हाबाहेरील १५ वर रुग्णांचा मृत्यू
जिल्हाबाहेरून नागपुरात येण्यासाठी जास्तीत जास्त दोन-तीन तासांवर वेळ लागतो. हा वेळ कोविड गंभीर रुग्णांसाठी महत्त्वाचा ठरतो. यातील अनेकांच्या शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झालेले असते. त्यांच्यावर तातडीने उपचारांची गरज असते. परंतु जिल्हाबाहेरील काही डॉक्टर आपली जबाबदारी झटकून त्यांना नागपुरात पाठवितात. यात महत्त्वाचा उपचाराचा कालावधी निघून जात असल्याने उपचारात शर्थीचे प्रयत्न करूनही रुग्णांना वाचविणे शक्य होत नाही.
लक्षणे नसलेले रुग्णही नागपुरात
चार दिवसापूर्वी अमरावती येथील एक लोकप्रतिनिधी थेट मेडिकलच्या अधिष्ठात्यांचा कक्षात शिरला. खिशातून पॉझिटिव्हचा अहवाल दाखवीत स्वत:ला भरती करण्यास सांगितले. या प्रकारामुळे कक्षात उपस्थित सर्व वरिष्ठ डॉक्टर अडचणीत आले. परंतु नंतर आवश्यक त्या उपाययोजना करीत संबंधित रुग्णाला कोविड हॉस्पिटलध्ये भरती केले. परंतु असे प्रकार मेडिकलच नाही तर मेयोमध्येही वाढल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.
एका रुग्णावर साधारण १० हजारावर खर्च
कोविडच्या एका रुग्णावर त्याच्या विविध चाचण्या, औषधोपचार, नाश्ता व भोजनावर साधारण १० ते ११ हजार रुपये खर्च येतो. रुग्ण जर गंभीर असेल तर औषधोपचाराचा खर्च दुपटीने वाढतो. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गंत हा खर्च जिल्हा प्रशासनस्तरावर केला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी निधी देण्यात आला आहे. बाहेरून येणाºया रुग्णांवर होणारा हा खर्च त्या-त्या जिल्हा प्रशासनाने उचलावा असा सूरही आता उमटू लागले आहे.