शहरातील श्वान नसबंदी केंद्रांवर नियंत्रण कुणाचे?
By निशांत वानखेडे | Published: July 22, 2024 06:24 PM2024-07-22T18:24:56+5:302024-07-22T18:25:56+5:30
माॅनिटरिंग टीमवर अनेक वर्षापासून ‘त्याच’ लाेकांचा समावेश : शस्त्रक्रियेदरम्यान जातात प्राण्यांचे जीव
निशांत वानखेडे
नागपूर : महापालिकेअंतर्गत चालणारे शेल्टर हाेम व नसबंदी केंद्र पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. मात्र या केंद्रांवर पुन्हा गैरप्रकार हाेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे या केंद्रांवर कुणाचे लक्ष आहे व देखरेख ठेवणारी ‘माॅनिटरिंग टीम’ अस्तित्वात आहे काय, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मनपाच्या श्वान पथकाने वैशालीनगर भागातून एका श्वानाला उचलून नेले हाेते. ६-७ दिवस ठेवल्यानंतर त्याच्यावर भांडेवाडी एबीसी केंद्रावर शस्त्रक्रिया करून तसेच साेडून देण्यात आले. धक्कादायक म्हणजे या मादी श्वानाचे आतडे बाहेर आले हाेते. रस्त्यावर तिला खाऊ घालणारे यश पाठराबे यांनी तक्रार केल्यानंतर श्वानाला परत उचलण्यात आले व कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. वाडी येथून उचलून आणलेल्या एका श्वानासाेबत गाेरेवाडा एबीसी केंद्रावर हाच प्रकार घडला. अशाचप्रकारे प्रतापनगर येथून एका भाजीविक्रेत्या महिलेच्या घरात घुसून पाळीव श्वान उचलून नेण्यात आल्याचीही माहिती आहे. शस्त्रक्रियेदरम्यान त्याचा मृत्यु झाल्याने ती महिलेला रडू आवरत नव्हते. अशा इतरही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे अनियमितता सुरू असताना अशा गैरप्रकारावर नियंत्रण कुणाचे आहे, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
अनेक वर्षापासून मर्जीतले सदस्य
वास्तविक प्राणी कल्याण मंडळ (एडब्ल्यूबीआय) च्या नियमानुसार नसबंदी केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘माॅनिटरिंग टीम’ असणे बंधनकारक आहे. या टीमद्वारे शृवान कुठून पकडले, श्वान पकडणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या शस्त्रक्रिया, अवयवांची विल्हेवाट लावणे, एबीसी केंद्रातील राेजचा अहवाल तपासणे अशी देखरेख केली जाते. यात प्रशासनिक अधिकाऱ्यांसह दाेन एनजीओ असतात. मात्र महापालिकेची माॅनिटरिंग टीम अस्तित्वहिन असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार १० वर्षापूर्वी ही टीम स्थापित करण्यात आली हाेती, त्यात नंतर कधीच बदल झाले नाहीत. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे शेल्टर हाेमचा कारभार आहे, तेच लाेक अनेक वर्षापासून या समितीवर असल्याचा आणि अधिकाऱ्यांच्या मर्जीतले सदस्य ठेवल्याचा गंभीर आराेप ‘सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन’च्या स्मिता मिरे यांनी केला आहे.
सुरू करण्यापूर्वी मंजुरी घेतली काय?
वास्तविक मनपाअंतर्गत शहरात भांडेवाडी, गाेरेवाडा व महाराजबागसमाेर एबीसी केंद्र सुरू हाेते. मात्र या केंद्रांवर प्रचंड अव्यवस्था, गैरप्रकार हाेत असल्याचा ठपका ठेवत भारतीय प्राणी कल्याण मंडळ (एडब्ल्यूबीआय) ने तिन्ही केंद्रांवर बंदी घातली हाेती व आवश्यक गाेष्टींची पूर्तता केल्याशिवाय केंद्र सुरू करण्यास मनाई केली हाेती. एडब्ल्यूबीआयकडून त्यासाठी मंजुरी घेणे आवश्यक हाेते. मात्र गेल्या सहा महिन्यात या केंद्रांवर काेणत्या सुविधा उपलब्ध केल्या माहिती नाही, पण हे तिन्ही केंद्र पूर्ववत सुरू करण्यात आले. याबाबत केंद्रांनी आवश्यक गाेष्टींची पूर्तता करून मंजूरी घेतली काय, असे विचारले असता एडब्ल्यूबीआयचे स्थानिक सदस्य अॅड. संजीव कपूर यांनी, याबाबत माहिती नसल्याचे व मुख्यालयी पत्रव्यवहार केल्याचे सांगितले.