नागपूर पं.स.वर झेंडा कुणाचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:45 AM2019-12-27T11:45:33+5:302019-12-27T11:47:56+5:30
नागपूर पंचायत समितीवर एक टर्म अपवाद वगळता काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सहा जिल्हा परिषद सर्कल व १२ पंचायत समिती गणात काँग्रेसची मजबूत पकड आहे.
सुरेश फलके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर ग्रामीण पंचायत समिती ही १२ गणांमध्ये विभागण्यात आली आहे. यात हिंगणा व कामठी विधानसभा मतदारसंघातील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. या पंचायत समितीमध्ये मागच्या वेळी भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने त्यांचीच सत्ता होती. यावेळी भाजपलाही बंडखोरीची लागण झाल्याने याचा फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे, पंचायत समितीच्या १२ ही गणांमध्ये काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होण्याचे संकेत मिळतात.
मावळत्या पंचायत समितीमध्ये भाजपचे सात, काँग्रेसचे चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य होता. स्पष्ट बहुमतामुळे येथे सभापती व उपसभापतिपदही भाजपकडेच होते.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुजित नितनवरे यांनी पक्षाच्या ध्येयधोरणावर टीका करीत भाजपला ‘रामराम’ ठोकला. नितनवरे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत. त्यांची लाव्हा परिसरातील मतदारांवर चांगली पकड आहे. त्यामुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागपूर पंचायत समितीवर एक टर्म अपवाद वगळता काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सहा जिल्हा परिषद सर्कल व १२ पंचायत समिती गणात काँग्रेसची मजबूत पकड आहे. मागच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढल्याने ही बाब भाजपच्या पथ्यावर पडली होती. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यामुळे त्यांची ताकद वाढल्याने भाजप उमेदवारांची डोकेदुखीही वाढली आहे.
या तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गण हिंगणा व कामठी मतदारसंघात विभागले आहेत. त्यामुळे ही निवडणूक माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. समीर मेघे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
त्याअनुषंगाने भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली असून, भाजपचे स्थानिक नेते तथा पंचायत समितीचे माजी सभापती अजय बोढारे, तालुकाध्यक्ष अध्यक्ष तथा सरपंच नरेश भोयर, सचिन इंगळे, कमलाकर शेंडे, देवराव कडू, नरेश चरडे, प्रमोद गमे, संजय कुंटे, संजय कपनीचोर, गजानन रामेकर, मधुकर बर्वे ही मंडळी कामाला लागली आहे.
दुसरीकडे, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार विजय घोडमारे, नाना गावंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुनिता गावंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदा राऊत, संध्या गावंडे, भीमराव कडू यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
शिवाय, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरपंच सुरेंद्र बानाईत, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील जामगडे, प्रणिता कडू, अनिल पाटील, महेश चोखांद्रे, श्याम मंडपे, मुकेश ढोमणे, शैलेश थोराने मतदारांच्या संपर्कात असून, त्यांना शिवसेनेन्या कार्यकर्त्यांची साथ मिळत आहे.
सत्तेसाठी कसरत
या पंचायत समितीचा बहुतांश भाग हा नागपूर शहरालगत आहे. यावेळी शिवसेना ही भाजपच्या विरोधात असल्याने तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भाजपला सत्ता सांभाळण्यासाठी तर काँग्रेस - राष्ट्रवादी भाजपच्या हातून सत्ता हिसकावण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. सुजित नितनवरे यांनी ऐनवेळी पक्ष सोडल्याने भाजपची ताकत काहिशी कमी झाल्याचेही बोलले जात आहे. भाजपमध्ये अंगर्तत कलह व काँग्रेस - राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत समन्वय असल्याचे दिसून येते.