एमपीएससी रॅकेटचा मुख्य ‘डील’र कोण? विदर्भात शंभरावर जणांना कॉल

By नरेश डोंगरे | Updated: February 1, 2025 21:53 IST2025-02-01T21:53:17+5:302025-02-01T21:53:32+5:30

पोलिसांनी फाडला दलालांचा पेपर

who is the main dealer of mpsc racket over a hundred people called in vidarbha | एमपीएससी रॅकेटचा मुख्य ‘डील’र कोण? विदर्भात शंभरावर जणांना कॉल

एमपीएससी रॅकेटचा मुख्य ‘डील’र कोण? विदर्भात शंभरावर जणांना कॉल

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एमपीएससीच्या परीक्षेला छेदू पाहणाऱ्या रॅकेटचा पेपर पोलिसांनी परिक्षेपूर्वीच फाडल्यामुळे अनेकांची डील भसकली आहे. या रॅकेटची पाळेमुळे विदर्भात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एमपीएससीची 'डील' करणाऱ्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, तो विदर्भातला की विदर्भाबाहेरचा, त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण करणाऱ्या या प्रकरणात 'मोठे' रॅकेट असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण करण्यासाठी हजारो विद्यार्थी रात्रीचा दिवस करतात. डोळे आणि डोकेदुखीस्तोवर अभ्यास करतात. मात्र, त्यांच्या कठीण परिश्रमावर काही समाजकंटकांनी पाणी फेरण्याचे कटकारस्थान रचले. ते उघड झाल्याने राज्यभरात खळबळ निर्माण झाली आहे.

चाळीस लाख द्या; एमपीएससीची प्रश्नपत्रिका घ्या

एमपीएससीच्या परिक्षेला काही तासांचा अवधी उरला असताना शेकडो परिक्षार्थ्यांना काही विशिष्ट नंबरवरून फोन कॉल्स आलेत. ४० लाख रुपये दिले तर एमपीएससीची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देऊ, असे पुढचा व्यक्ती बोलत होता. ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि चाैकशीची चक्र गतीमान झाली.

त्यांना नंबर कुणी पुरविले?

प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची अपेक्षा आहे. तूर्त अमूक उमेदवाराने एमपीएससीचा फॉर्म भरला, याची माहिती या रॅकेटला कुणी दिली, त्या परिक्षार्थ्यांचे मोबाईल नंबर या आरोपींना कुणी पुरविले, असा प्रश्न आहे. या एकाच प्रश्नातून अनेक उत्तरे पुढे येणार आहेत. आपला फॉर्मवर नमूद केलेला मोबाईल नंबर एमपीएससीशी संबंधित सूत्रांकडेच असू शकतो, असे वाटल्यामुळेच आरोपींसोबत अनेकांनी डील पक्की केली असावी, असा अंदाज आहे.

प्रकरण गुंतागुंतीचे

पुणे पोलिसांच्या माहितीवरून येथील गुन्हे शाखेचे उपायुक्त राहुल माकणिकर यांनी तातडीने आपली टीम भंडारा येथे पाठवून दीपक यशवंत साखरे (वय २८, रा. वाराशिवनी, बालाघाट) तसेच योगेश सुरेंद्र वाघमारे (वय २८, रा. वरठी, भंडारा) या दोघांना अटक केली. आशिष नेतलाला कुलपे (वय ३०) आणि प्रदीप नेतलाला कुलपे (वय २८) हे वरठीत राहणारे दोन सख्खे भाऊ फरार झाले. मात्र, यातील मुख्य सूत्रधार कोण, हे स्पष्ट व्हायचे आहे. हे प्रकरण फार गुंतागुंतीचे असल्याचे पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी 'लोकमत'ला सांगितले आहे.

२५-३० जणांशी डील पक्की?

ईकडे पोलिसांनी कारवाईसाठी पाश आवळून आरोपींची धरपकड सुरू केली असली तरी गेल्या आठवडाभरात या रॅकेटने शेकडो उमेदवारांना कॉल केले आहे. त्यांना 'उज्ज्वल भविष्याचे' आमिष दाखवून कुणाशी २५, कुणाशी, ३० तर कुणाशी ४० लाखांत डील पक्की केल्याची संबंधित सूत्रांची माहिती आहे.
 

Web Title: who is the main dealer of mpsc racket over a hundred people called in vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.