मराठी माणसाची लायकी काढणारे काळे कोण? मराठीजन संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 10:13 AM2018-01-06T10:13:21+5:302018-01-06T10:13:34+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘मराठी भाषा संरक्षण व संवर्धन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी डॉ. काळे यांनी हे वादग्रस्त विधान केल्यामुळे खळबळ उडाली असून अनेकांनी या विधानाचा निषेध नोंदवला.

Who is this Kale, angry Marathi man's question | मराठी माणसाची लायकी काढणारे काळे कोण? मराठीजन संतापले

मराठी माणसाची लायकी काढणारे काळे कोण? मराठीजन संतापले

Next
ठळक मुद्देसाहित्य सृष्टीतूनही संतप्त प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठी आणि मराठीजनांचे श्रेष्ठत्व दिल्लीने कायम मान्य केले. महाराष्ट्राने अवघ्या देशाला वैचारिक नेतृत्व दिले आहे. असा इतिहास असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाण्याची मराठी लोकांची लायकीच नाही, असे विधान डॉ.अक्षयकुमार काळे यांनी कोणत्या आधारे केले, असे विधान करणारे ते होतात कोण, असा संतप्त सवाल साहित्यसृष्टीतून विचारला जात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘मराठी भाषा संरक्षण व संवर्धन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी डॉ. काळे यांनी हे वादग्रस्त विधान केल्यामुळे खळबळ उडाली असून अनेकांनी या विधानाचा निषेध नोंदवला.

मी माझ्या लायकीबद्दल बोललो
गुरुवारच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी ‘तुम्ही पंतप्रधानांना भेटून हे निवेदन देणार का’ असे मला विचारले. यावर मी ‘पंतप्रधान मला भेटीची वेळ देऊन हे निवेदन स्वीकारतील, अशी माझी लायकी आहे ’ असे उत्तर दिले. लायकी हा शब्द मला ‘पात्रता’ याअर्थी वापरायचा नव्हता तर ‘पोहोच’ याअर्थी वापरायचा होता आणि तो केवळ मी माझ्याच संदर्भात वापरला होता. हे विधान समस्त मराठीजनांसाठी नव्हते.
- डॉ. अक्षयकुमार काळे, माजी संमेलनाध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन

काळेंनी आतापर्यंत झोपा काढल्या का?
. काळे यांचे विधान वाचून धक्का बसला. काळेंना अभिजात मराठीची इतकी घाई झाली आहे. परंतु तिकडे १२०० मराठी शाळा बंद झाल्या, बेळगावातील मराठीजनांवर अत्याचार आजही सुरू आहेत. यावर ते कधी काही बोलत नाही. ते स्वत: साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना या विषयावर कुठलीही ठाम भूमिका त्यांनी घेतली नाही. आता तेच मराठी जणांची लायकी काढत आहेत. त्यांनी स्वत: आतापर्यंत झोपाच काढल्या का?
- डॉ. रवींद्र शोभणे, कादंबरीकार

हे विधान गंभीरतेने घेण्याचे कारण नाही
डॉ.अक्षयकुमार काळे जे काही बोलले त्या विधानाला इतक्या गंभीरतेने घेण्याचे काहीच कारण नाही. मराठीचे अभिजातत्व हे एकटे काळे नव्हे तर एकूणच मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी कुणीही असे विधान करू नये आणि माध्यमांनीही अशा विषयांना उगाच हवा देऊ नये
- डॉ. किशोर सानप, संत साहित्यिक

हा १२ कोटी मराठी जनतेचा अपमान
शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण या मराठी नेत्यांचा सल्ला घेतल्याशिवाय तत्कालीन पंतप्रधान पुढे पाऊल टाकत नव्हते हा इतिहास आहे. वर्तमानातही नितीन गडकरींसारखा मराठी नेता देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठवतोय. अशा स्थितीत पंतप्रधानांना भेटण्याची मराठी माणसाची लायकी नाही, असे डॉ. काळे कसे म्हणू शकतात? त्यांचे हे विधान म्हणजे १२ कोटी मराठी जनतेचा अपमान आहे. मी मराठीचा प्राध्यापक व अभ्यासक म्हणून या विधानाचा निषेध करतो.
- प्रा. दीपककुमार खोब्रागडे, मराठी विभाग प्रमुख, डॉ. आंबेडकर कॉलेज

Web Title: Who is this Kale, angry Marathi man's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.