‘नोटा’मुळे कुणाचा झाला तोटा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:09 AM2021-01-23T04:09:18+5:302021-01-23T04:09:18+5:30

नागपूर ग्रामीण तालुक्यात सर्वाधिक नोटा जितेंद्र ढवळे नागपूर : ग्रामपंचायतच्या निकालानंतर आता गावगाड्यात मतांची गोळाबेरीज केली जात आहे. कोणत्या ...

Who lost due to 'NOTA'? | ‘नोटा’मुळे कुणाचा झाला तोटा?

‘नोटा’मुळे कुणाचा झाला तोटा?

Next

नागपूर ग्रामीण तालुक्यात सर्वाधिक नोटा

जितेंद्र ढवळे

नागपूर : ग्रामपंचायतच्या निकालानंतर आता गावगाड्यात मतांची गोळाबेरीज केली जात आहे. कोणत्या गल्लीत कोणत्या गटाला किती मते पडली. कोणता वॉर्ड सोबत राहिला. कोणत्या वॉर्डाने धोका दिला. याचा हिशोब निवडणूक जिंकणारा आणि हरणारा असे दोन्ही गट करताना दिसत आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीपर्यंत मतांचा हा हिशोब कायम राहील! मात्र आता गावगाड्यातही नोटाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती पुढे आली. नागपूर जिल्ह्यात ८,१८६ मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केले आहे. ग्रा.पं.च्या निकालानंतर आता राजकीय गटाकडून गावागावांत सत्ता स्थापनेवरून कलगीतुरा रंगला असताना जिल्ह्यातील ८,१८६ मतदारांनी नोटाला मतदान केल्याने ‌‘नोटा’चा कुणाला तोटा झाला यावरही मंथन करणे आवश्यक आहे.

लोकशाही व्यवस्थेत मताधिकाराला सर्वोच्च स्थान आहे. ग्रा.पं. निवडणुकीत तर एका मताला विशेष महत्त्व आहे. नागपूर जिल्ह्यात १२९ ग्रा.पं.च्या (दोन बिनविरोध) निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पाडल्या. यात ३,१७,२४७ पैकी २,३७,५७९ (७४.८९) मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. या तेरा तालुक्यांतील ८,१८६ मतदारांनी मात्र एकही उमेदवार योग्य नाही, असे दर्शवित मताधिकाराचा वापर केला आहे. नागपूर ग्रामीण तालुक्यात याचे प्रमाण अधिक आहे. नागपूर ग्रामीण तालुक्यात ११ ग्रा.पं.साठी निवडणुका घेण्यात आल्या. तीत ७३,७४६ पैकी ४१,५७५ (५६.३८ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तीत २,०३४ मतदारांनी नोटाला मतदान केले आहे. नागपूर ग्रामीण तालुक्यापाठोपाठ सर्वाधिक २४ ग्रा.पं.च्या निवडणुका असलेल्या कुही तालुक्यात नोटाचा वापर केला आहे. तालुक्यात ७२,१२६ पैकी ६०,८८६ (८४.४२ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात १,०६७ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. सावनेर तालुक्यात १२ पैकी जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली. ११ ग्रा.पं.साठी झालेल्या निवडणुकीत ३०,२६१ पैकी २०,९८९ (६९.३६ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात १,१३६ मतदारांनी नोटाला मतदान केले.

चार ठिकाणी समान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीचा कौल

- ग्रा.पं. निवडणुकीत एका मताला विशेष महत्त्व असते. नरखेड तालुक्यातील दोन उमेदवारांना ईश्वरचिठ्ठीने कौल दिला आहे. दातेवाडी येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये विलास बारमासे व सुरेंद्र इंगोले या दोघांनाही प्रत्येकी ९४ मते मिळाली. यात विलास बारमासे ईश्वरचिठ्ठीने विजयी झाले.

- मदना येथे वॉर्ड क्रमांक १ मध्ये जनार्दन उमक व धनराज उमक यांना प्रत्येकी ८१ मते मिळाल्याने निर्णय देण्यासाठी ईश्वरचिठ्ठीचा आधार घ्यावा लागला. यात ईश्वरचिठ्ठीने जनार्दन उमक यांना कौल दिल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

- हिंगणा तालुक्यातील सातगाव ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक २ मध्ये ज्योत्स्ना सुभाष कोल्हे व ज्योती क्रिष्णा नागपुरे या दोन उमेदवारांना सारखी (१९८) मते पडली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईश्वरचिठ्ठीच्या आधारे विजयी उमेदवार घोषित केला. ज्योत्स्ना कोल्हे यांना ईश्वरचिठ्ठीचा लाभ झाला.

- कळमेश्वर तालुक्यात सावंगी (घोगली) येथे वॉर्ड क्रमांक २ मधून सर्वसाधारण गटातून अनिकेत निखाडे व प्रशांत शेटे यांना प्रत्येकी २१३ मते मिळाली. यात ईश्वरचिठ्ठीने प्रशांत शेटे यांना कौल दिल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

बहादुरा ग्रा.पं.त नोटा सर्वाधिक मते

नागपूर ग्रामीण तालुक्यात सर्वाधिक २,०३४ मतदारांनी नोटाचा वापर केला. तालुक्यात १७ सदस्यीय असलेल्या बहादुरा ग्रा.पं.साठी झालेल्या निवडणुकीत ५७७ मतदारांनी नोटाला मतदान केले. याच तालुक्यात दवलामेटी (१७ सदस्यीय) ग्रा.पं.मध्ये ४०६ जणांनी नोटाला मतदान केले. यापाठाेपाठ सावनेर तालुक्यातील पोटा ग्रा.पं.च्या निवडणुकीत ३९३ मतदारांनी नोटाला मतदान केले आहे.

‘त्या’ दोघी एका मताने जिंकल्या

नरखेड तालुक्यातील खैरगाव येथे वॉर्ड क्रमांक ४ मध्ये ग्रामविकास जनजागृती आघाडीच्या करुणा चौधरी यांनी केवळ एका मताने विजय संपादन केला. त्यांना २५७, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी जनता विकास आघाडीच्या अर्चना कोरडे यांना २५६ मते मिळाली.

- नागपूर ग्रामीण तालुक्यात धामना लिंगा ग्रा.पं.च्या निवडणुकीत रिना सरदार यांना २५३ मते पडली. त्यांच्या प्रतिस्पर्धी नलू शेंडे यांना २५२ मते मिळाली. रिना यांचा केवळ एका मताने विजय झाला.

तालुकानिहाय नोटाला मिळालेली मते

काटोल - ८९

नरखेड - ६४४

सावनेर - १,१३६

कळमेश्वर - २८०

रामटेक - ८२८

पारशिवनी - ५३१

मौदा - १०२

कामठी - ३३७

उमरेड - ५२१

भिवापूर - २२०

कुही - १,०६७

नागपूर ग्रा.- २,०३४

हिंगणा - ३९७

Web Title: Who lost due to 'NOTA'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.