कोण करतेय डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांचा गेम ? : परीक्षा मंडळावर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 02:01 PM2017-11-25T14:01:51+5:302017-11-25T14:03:07+5:30

कुलगुरु डॉ.सिद्धार्थ विनायक काणे यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठ सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आणि कराड येथील क्रिष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी १९८७ मध्ये मिळविलेल्या गांधी विचारधारा पदव्युत्तर पदविकेवरून ३० वर्षानंतर विद्यापीठात वादळ उठले आहे.

Who make the game of Dr. Ved Prakash Mishra? : watching at the examination board | कोण करतेय डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांचा गेम ? : परीक्षा मंडळावर नजर

कोण करतेय डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांचा गेम ? : परीक्षा मंडळावर नजर

Next
ठळक मुद्देकुलगुरुंची ‘गुरुंना’ गुरुदक्षिणा की ?


जितेंद्र ढवळे

आॅनलाईन लोकमत

नागपूर : कुलगुरु डॉ.सिद्धार्थ विनायक काणे यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठ सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आणि कराड येथील क्रिष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी १९८७ मध्ये मिळविलेल्या गांधी विचारधारा पदव्युत्तर पदविकेवरून ३० वर्षानंतर विद्यापीठात वादळ उठले आहे. गेली ४० वर्षे ज्यांना विद्यापीठाने ‘गुरु ’ मानले त्या डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचा विद्यापीठात नेमका गेम कोण करतेय, यावरून नागपूरच्या शैक्षणिक वर्तुळात एक्झिट पोल सुरू आहे.
मिश्रा यांची पदवी वैध की अवैध हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार परीक्षा मंडळाला असला तरी भविष्यात या चक्रीवादळात अनेक जण सापडण्याची शक्यता आहे. मात्र ज्या कुलगरु डॉ.सिद्धार्थ विनायक काणे यांच्या कार्यकाळात विद्यापीठाचा सर्वोच्च मानला जाणारा ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना प्रदान करण्यात आला त्याच कुलगुरुंच्या कार्यकाळात डॉ. मिश्रा यांची गांधी विचारधारेतील पदव्युत्तर पदविका रद्द करण्यावर विद्यापीठात गुप्त आॅपरेशन सुरू आहे. हा केवळ दुर्देवी योगायोग समजावा की घडवून आणलेला ‘योग’ ! मात्र हा योग नेमका कुणी घडवून आणला. चार महिन्यापासून सुरू असलेल्या लेटरबॉम्बवर कुलगुरु आणि प्र-कुलगुरुंनी डागलेले हे क्षेपणास्त्र आहे, हे परीक्षा मंडळाच्या बैठकीतच ठरेल.
मात्र ज्यांना ‘गुरु’मानले त्यांना अशा प्रकारची ‘गुरुदक्षिणा’ देण्याचा प्रसंग कुलगुरु काणे यांच्यावर का आला ? काणे यांच्याकडून कुणी हे करवून घेत आहे का ? याचा विद्यापीठ निवडणुकांशी काही संबंध आहे का? प्राधिकरण नामनिर्देशनाच्या प्रक्रियेत कुलगुरुंच्या कृतीमुळे कुणी दुखावलेले तर नाही ना, हे २७ नोव्हेंबरनंतरच स्पष्ट होईल.
मात्र डॉ. मिश्रा यांची ‘ती’ पदवी रद्द करण्यासंदर्भातील कारवाई विद्यापीठ प्रशासनाने सुरू केली असून त्या संदर्भातील एक गोपनीय लिफाफा कुलगुरु (व्हाया प्र-कुलगुरु) कार्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे गुरुवारीच पाठविण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.
डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी १९८७ मध्ये मिळविलेल्या गांधी विचारधारा पदव्युत्तर पदविकेच्या फिल्ड रिपोर्टमध्ये आर.व्ही.राव यांनी १९६९ मध्ये लिहिलेल्या पुस्तकातील दहा प्रकरणे जशीच्या तशी लिहिल्याचे तथ्य न्या.रत्नपारखी समितीने १९९२ मध्ये लक्षात आणून दिले होते. यानंतर ९ आॅक्टोबर रोजी झालेल्या तत्कालीन कार्यकारी परिषदेच्या बैठकीत डॉ.रत्नपारखी समितीच्या अहवालावर शिक्कामोर्तबही झाले होते.
यानंतर डॉ. मिश्रा यांनी या निर्णयाला दिवाणी सत्र न्यायालयात आव्हानही दिले होते. न्यायालयाने २२ नोव्हेंबर २०१३ रोजी हा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे १९९२ साली घेण्यात आलेल्या कार्यकारी परिषदेच्या निर्णयावर कारवाई करण्यात यावी, यावर मागील चार वर्षांपासून विद्यापीठात मंथन सुरू आहे. या चार वर्षांत डॉ.काणे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळही मोडतो, हे विशेष.
डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्या विद्वत्तेचा विद्यापीठाला फायदा व्हावा, यासाठी त्यांच्या अध्यक्षतेत सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आल्याचे डॉ. काणे यांनी दोन वर्षापूर्वी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. त्यावेळी काणे यांनी हा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून घेतला होता की स्वत:च्या बुद्धिमत्तेने हे अजूनही कोडेच आहे.
काणे सांख्यिकीचे प्राध्यापक असले तरी विद्यापीठातील राजकीय गणिते त्यांना अद्याप उलगडता आलेली नाही. त्यामुळे आॅपरेशन मिश्रामध्ये काणे यांचीच कोंडी झाली तर अनर्थ ठरेल. तसा योग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण विद्यापीठात कोणतेही मिशन ‘भाऊ’ आणि ‘राव’ यांचा हात लागल्याशिवाय होत नाही. त्यामुळे तातडीने बोलविण्यात आलेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत रत्नपारखी समितीच्या अहवालावर शिक्कामोर्तब झाले नाही तर नव्याने स्थापन होणाऱ्या परीक्षा मंडळापुढे रत्नपारखी समितीचा अहवाल जाईल की नाही, हे विद्यापीठ निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.
दुसऱ्या  मिश्रांचे काय ?
विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात नेहमीच दोन मिश्रांची चर्चा राहिली आहे. रत्नपारखी समितीच्या माध्यमातून कुलगुरु आणि विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या एकेकाळचा हिरा असलेल्या डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्यावर नेम साधला आहे.
मात्र दुसरे मिश्राही सध्या माहितीच्या अधिकारामुळे विद्यापीठात चर्चेत आले आहेत. विद्यापीठाच्या जनसंवाद मंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी सीताबर्डी पोलिसात काही दिवसांपूर्वी एक तक्रार दाखली केली होती. यात त्यांनी परीक्षा नियंत्रक असताना डॉ. काणे यांच्या विश्वासार्हतेबद्दल आक्षेप घेतला आहे.
तक्रार खोटी असल्यास काणे यांनी आपल्या विरुद्ध पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवावी, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. मिश्रा यांच्या तक्रारीत तथ्य नसेल तर प्रामाणिक कुलगुरुंना त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास काहीच हरकत नाही. मात्र तसे का होत नाही, ही न समजणारीच बाब आहे.
तुुपकरी यांनी केली होती पोलखोल
डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा पदविका अभ्यासक्रमातील शोधप्रबंधात उचलेगिरी केल्याचा सर्वात पहिला आरोप तत्कालीन सिनेट सदस्य रामभाऊ तुपकरी यांनी १९९१ मध्ये केला होता. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत तत्कालीन कुलपतींनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते.
आजवर किती अहवालावर कारवाई झाली ?
नागपूर विद्यापीठात गेल्या २० वर्षात किती प्रकरणात हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन करण्यात आली. यात समितीने दिलेल्या अहवालानुसार किती लोकांवर कारवाई झाली, याचाही अभ्यास मिश्रा प्रकरणाच्या निमित्ताने कुलगुरुंनी करावा, अशी मागणी एका माजी प्र-कुलगुरुंनी केली आहे. तसे झाल्यास काणे यांचे नाव विद्यापीठाच्या इतिहासात नोंदविले जाईल, असेही ते म्हणाले.

Web Title: Who make the game of Dr. Ved Prakash Mishra? : watching at the examination board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.