एकनाथ निमगडे हत्याकांडाचा मास्टरमाईंड कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 08:06 PM2021-05-27T20:06:36+5:302021-05-27T20:20:19+5:30
Eknath Nimgade murder case आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्याकांडाचा मास्टरमाइंड कोण आहे हे तातडीने जाहीर करून संबंधित गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उज्ज्वल व अनुपम निमगडे या दोन मुलांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना केली आहे. याकरिता त्यांनी गुरुवारी अमितेशकुमार यांना निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्याकांडाचा मास्टरमाइंड कोण आहे हे तातडीने जाहीर करून संबंधित गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उज्ज्वल व अनुपम निमगडे या दोन मुलांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना केली आहे. याकरिता त्यांनी गुरुवारी अमितेशकुमार यांना निवेदन सादर केले.
नागपूरपोलिसांनी १७ मार्च २०२१ रोजी पत्रकार परिषद आयोजित करून या हत्याकांडात १४ आरोपी सामील असल्याची माहिती दिली होती व मुख्य आरोपी रणजित सफेलकर याच्यासह नऊ आरोपींची नावे जाहीर केली होती. तसेच, मास्टरमाईंडचे नाव आवश्यक तपास पूर्ण झाल्यानंतर जाहीर केले जाईल असे सांगितले होते. त्यानंतर ७२ दिवस लोटून गेले असून, मास्टरमाईंड कोण आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. पत्रकार परिषदेनंतर संबंधित मास्टरमाईंड सावध झाला असेल. त्याने स्वत:ला वाचवण्यासाठी आवश्यक तयारीही केली असेल. या परिस्थितीत निमगडे कुटुंबीयांना असलेला धोका वाढला आहे. सर्वांना दहशतीमध्ये जगावे लागत आहे. करिता, निमगडे कुटुंबीयांना सुरक्षा पुरविण्यात यावी व मास्टरमाईंडला अटक करण्यासाठी वेगवान पावले उचलण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.