मनपा आयुक्तांचे बोलवते धनी कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:08 AM2020-12-22T04:08:38+5:302020-12-22T04:08:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कायद्यानुसार स्थायी समितीने बजेट मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मनपा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कायद्यानुसार स्थायी समितीने बजेट मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मनपा आयुक्तांनी मंजूर कामांना ब्रेक लावले आहे. भाजपच्या कार्यकाळात शहरात विकास कामे होऊ नये, असे काही लोकांना वाटते. त्यांचे बोलवते धनी वेगळे आहेत. येणाऱ्या काळात ते पुढे येतीलच, गरज पडल्यास या विरोधात भाजप संघर्षाची भूमिका घेईल, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
माझ्या कार्यकाळात तीन आयुक्तांच्या कामकाजाचा अनुभव घेतला. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात महापौर निधीतील प्रकल्प अपूर्ण राहिले. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी वॉक अॅन्ड टॉक विथ मेअर, ब्रेकफास्ट विथ मेअर उपक्रम राबविले. जनता दरबार घेतले. स्वच्छता मोहिमेसाठी मम्मी पापा यू टू मोहीम राबविली. यातून स्वच्छतेत नागपूरचा क्रमांक १८ आला. आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या कार्यकाळात कोरोना रुग्णांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली. असे जोशी यांनी सांगितले.
........
ओसीडब्ल्यूची खुशाल चौकशी करावी
यूपीए सरकारने नागपूर शहरातील २४ बाय ७ योजनेची प्रशंसा करून पुरस्कार दिला होता. या प्रकल्पात कोणत्याही प्रकारची अनियमितता नाही. काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या कार्यकाळात शहरात १५ जलकुंभ उभारण्यात आले. तर भाजपच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात ५५ जलकुंभ उभारले, अमृत योजनेच्या माध्यमातून लवकरच पुन्हा ३० जलकुंभ उभारले जात आहेत. वर्षभराने होत असलेली महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून विकास कामांना ब्रेक लावण्यासाठी चौकशी केली जात आहे. ती खुशाल करावी. असे संदीप जोशी यांनी प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
..............
मुुंढेंमुळे शौचालय झाले नाही
महापौर निधीतून शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला. परंतु तत्कालीन आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी फाईल रोखली. त्यांनी महापौर फंडातील एक रुपयाही खर्च केला नाही. यामुळे शौचालय उभारता आले नाही, अशी खंत जोशी यांनी व्यक्त केली. मुंढे यांच्याशी वैयक्तिक मतभेद नव्हते. परंतु एकाधिकारहीमुळे ते ऐकत नव्हते.
........
पदवीधर निवडणुकीवर मंथन
पदवीधर मतदार संघातील निवडणुकीनंतर पॉझिटिव्ह आलो. अजूनही आजारी आहे. या निवडणुकीवर पक्षात मंथन सुरू आहे. भाजपा सर्वधर्मियांचा पक्ष आहे. निवडणुकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणर असल्याचे जोशी म्हणाले.