कुणामुळे रखडली पदभरती?

By admin | Published: April 16, 2015 02:05 AM2015-04-16T02:05:31+5:302015-04-16T02:05:31+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ५६ शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे अद्यापही रिक्त आहेत. या

Who is recruited for recruitment? | कुणामुळे रखडली पदभरती?

कुणामुळे रखडली पदभरती?

Next

नागपूर विद्यापीठ : अंतर्गत राजकारणाचा उमेदवारांना फटका
नागपूर :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ५६ शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे अद्यापही रिक्त आहेत. या पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढून दोन वर्षांचा कालावधी होत आला असला तरी अद्यापही ही भरती रखडलेली आहे. ही पदभरती रखडण्यामागे विद्यापीठातील अंतर्गत राजकारण कारणीभूत असून येणाऱ्या काळात यावरून मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, ही पदभरती नेमकी कुणामुळे रखडली असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात येत आहे.

नागपूर विद्यापीठाने २०१३ साली उपकुलसचिव, विद्यापीठ अभियंता, सहायक कुलसचिव, प्रोग्रामर, अधीक्षक, वरिष्ठ व कनिष्ठ लघुलेखक इत्यादी ५६ शिक्षकेतर रिक्त पदांसाठी जाहिरात काढली होती. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्रतेसंदभार्तील निकष ठरवण्यासाठी डॉ. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली दिशानिर्देश समिती स्थापन करण्यात आली. समितीने केलेल्या शिफारशी कुलगुरूंनी विद्यापीठ कायद्याच्या कलम १४ (८) अंतर्गत मान्य केल्या. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत डॉ.डी.के.अग्रवाल यांनी शिक्षकेतर पदांच्या भरतीनियमांवर आक्षेप घेतला होता. नवे दिशानिर्देश येत असताना, जुन्याच नियमांप्रमाणे जाहिरात का काढली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
त्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी राजीनामा दिला. त्यामुळे या पदभरतीसाठी मुलाखतीच झाल्या नाही. दरम्यानच्या काळात रोस्टरमध्ये बदल, मराठा-मुस्लीम आरक्षण मंजुरी, स्थगिती असे अनेक बदल घडले. यासंदर्भात वारंवार व्यवस्थापन परिषदांच्या बैठकांमध्ये शाब्दिक चकमकी होत गेल्या. जुन्या जाहिरातीनुसार पदे न भरता नियमित कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली नवीन जाहिरात देऊन पदे भरली जावीत, असा आग्रह विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी धरला आहे. कोणत्या पदावर कोणते उमेदवार येणार याची अगोदरच माहिती असल्याचा दावा संघटनांतर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे नव्या दिशानिर्देशांनुसार पदभरती व्हावी असा आग्रह त्यांनी धरला आहे.
भरतीसाठी नियम कुठले लावावे याबाबत संभ्रम असल्याने कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णय माजी प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांनी घेतला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्याच दिशानिर्देशांप्रमाणे पदभरती करण्यास काहीच हरकत नाही असे मत कायदेतज्ज्ञांनी दिले होते. परंतु तरीदेखील यासंदर्भात काहीच प्रक्रिया झाली नाही.(प्रतिनिधी)

सर्वांचेच सावध पाऊल
वर्तमान प्राधिकरणांचा कालावधी आॅगस्ट महिन्यात संपुष्टात येणार आहे. अशा स्थितीत निवडणुकांना सामोरे जाताना कोणाचीही नाराजी का पत्करायची या विचारातून प्रशासन व विविध संघटनांनी पदभरतीच्या मुद्यावर सावध पवित्रा घेतला आहे. जर पदभरती झाली तर अनेकांचा विरोध अन् पदभरती नाही झाली तर अगोदर झालेले ‘सेटिंग’ बिघडण्याची भीती अशी स्थितीदेखील काही जणांपुढे निर्माण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.यासंदर्भात नवनियुक्त कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता त्यांनीदेखील यावर ठोस भूमिका घेतलेली नाही. या मुद्याची सखोल माहिती घेऊनच मग काय करायचे ते ठरवू असे ते म्हणाले.

Web Title: Who is recruited for recruitment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.