नागपूर सचिवालय परिसरातील कुत्र्यांचा बंदोबस्त कुणाकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 09:22 PM2018-06-29T21:22:18+5:302018-06-29T21:24:03+5:30
पावसाळी अधिवेशनाला आता केवळ काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. पावसापासून बचावासाठी प्रशासनातर्फे ‘रेनप्रूफ’ व्यवस्था केली जात आहे. पावसात साप निघण्याची शक्यता लक्षात घेता सर्पमित्रांचीही मदत घेतली जात आहे, असे असले तरी शहरातील बेवारस कुत्र्यांचाही बंदोबस्त प्रशासनाला करावा लागणार आहे. कारण सिव्हील लाईन्स परिसरातील नवीन सचिवालय परिसरात बेवारस कुत्र्यांनी अक्षरश: हैदोस घातलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळी अधिवेशनाला आता केवळ काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. पावसापासून बचावासाठी प्रशासनातर्फे ‘रेनप्रूफ’ व्यवस्था केली जात आहे. पावसात साप निघण्याची शक्यता लक्षात घेता सर्पमित्रांचीही मदत घेतली जात आहे, असे असले तरी शहरातील बेवारस कुत्र्यांचाही बंदोबस्त प्रशासनाला करावा लागणार आहे. कारण सिव्हील लाईन्स परिसरातील नवीन सचिवालय परिसरात बेवारस कुत्र्यांनी अक्षरश: हैदोस घातलेला आहे.
शहरात सर्वत्रच कुठल्याही चौकात, रस्त्यावर बेवारस कुत्र्यांचे घोळके टपून असतात. रस्त्यावरून वाहन येताच त्यांच्यावर धावून पडतात. दुचाकी वाहन चालकांना तर आपला जीव मुठीत घेऊनच रस्त्याने चालावे लागते. दुचाकीस्वारांवर कुत्रे धावून पडले की, त्याचा अपघात ठरलेलाच, अशी परिस्थिती आहे. यातच आता सिव्हील लाईन्स परिसरातील व्हीसीए स्टेडियम चौकात असलेल्या नवीन सचिवालय परिसरात बेवारस कुत्र्यांनी हैदोस घातल्याची बाब समोर आली आहे. इमारतीत अनेक शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयात बेवारस कुत्रे ठाण मांडून असतात. तीन माळ्याच्या या इमारतीत तब्बल २० बेवारस कुत्रे आहेत. ते पायऱ्यांवर, कार्यालयात, ठिकठिकाणी ठाण मांडून असतात. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनाही मोठा त्रास होतो. ही कुत्रे कार्यालय परिसरातच घाण करीत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते. इतकेच नव्हे तर रात्री रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांवरही हे कुत्रे धावून जातात. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली, परंतु दुर्लक्ष करण्यात आले. हा प्रकार केवळ या इमारतीपुरताच मर्यादित आहे, असा नाही. रविभवन, नागभवन, आमदार निवास, १६० खोल्यांचे गाळे आदी भागातही बेवारस कुत्र्यांचा वावर आहे. तेव्हा प्रशासनाला यांचाही बंदोबस्त करावा लागेल, अन्यथा अधिवेशनादरम्यान ही बेवारस कुत्रे त्रासदायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.