आरोपी पळाल्याचे सांगितले कुणी?
By Admin | Published: July 27, 2016 02:43 AM2016-07-27T02:43:21+5:302016-07-27T02:43:21+5:30
पोलीस ठाण्यातून आरोपी पळून गेल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच हादरलेल्या जरीपटका पोलिसांनी आरोपीला सोडून हे वृत्त बाहेर गेलेच कसे
जरीपटका ठाण्यातून आरोपी पळाला : पोलीस कर्मचाऱ्यांची खरडपट्टी
नागपूर : पोलीस ठाण्यातून आरोपी पळून गेल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच हादरलेल्या जरीपटका पोलिसांनी आरोपीला सोडून हे वृत्त बाहेर गेलेच कसे, त्याचा सकाळपासून शोध घेणे सुरू केले. दुपारनंतर आरोपी विक्की बागडेची पोलिसांनी शोधाशोध केली.
सोमवारी रात्री ११ च्या सुमारास आरोपी विक्कीला पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात पकडून ठाण्यात आणले. त्याला अटकपूर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी ठाण्यात बसविले. मध्यरात्री पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे पाहत विक्कीने ठाण्यातून पळ काढला. ही घटना लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात प्रचंड खळबळ निर्माण झाली. पळालेल्या आरोपीला शोधण्यासाठी जरीपटका पोलिसांची विविध पथके परिसरात शोध घेऊ लागली. विशेष म्हणजे, अख्खे पोलीस ठाणे आरोपीला शोधण्यासाठी फिरत होते. मात्र, खरडपट्टी निघू शकते, या भीतीमुळे या आरोपी पलायनाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्याचे टाळण्यात आले. त्यामुळे अन्य वरिष्ठ अधिकारीच काय, नाईट राऊंडवर असलेले विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त शैलेष बलकवडे यांनासुद्धा या घटनेची रात्री १ वाजेपर्यंत माहिती देण्यात आली नव्हती. माहिती कक्ष आणि नियंत्रण कक्षाकडेही याबाबत कसलीच माहिती नव्हती. जरीपटका ठाण्यातील फोन उचलून बोलायला कुणी तयार नव्हते.
प्रस्तुत प्रतिनिधीने जरीपटका ठाण्यातून पहाटे २ च्या सुमारास या घटनेची माहिती घेतल्यानंतर ती बातमी लोकमतने ठळकपणे प्रकाशित केली. त्यामुळे हादरलेल्या जरीपटका पोलिसांनी ही बातमी बाहेर गेलीच कशी, त्याचीच सकाळपासून चौकशी केली. काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यावर त्यासाठी तोंडसुखही घेतले. (प्रतिनिधी)