कोण हा दिल्लीचा ठगबाज ? नागपूरच्या कापड विक्रेत्याचे आठ लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 07:25 PM2018-07-11T19:25:17+5:302018-07-11T19:29:49+5:30
२५ लाखांचे कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात एका कापड विक्रेत्याने आपले आठ लाख रुपये गमविले. दिल्लीतील ठगांच्या टोळीने त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी मंगळवारी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २५ लाखांचे कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात एका कापड विक्रेत्याने आपले आठ लाख रुपये गमविले. दिल्लीतील ठगांच्या टोळीने त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी मंगळवारी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नरेंद्रनगरच्या गुरुदत्त कॉलनीतील गजानन महाराज मंदिराजवळ निशिकांत रामलाल शेंडे (वय ४९) राहतात. त्यांचे कपड्याचे दुकान आहे. मोठे भांडवल गुंतवून व्यापार वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेंडे यांनी कमी व्याजदरात कर्ज कुठून मिळेल, त्याची चौकशी चालवली होती. एप्रिल महिन्यात त्यांना रिलायन्स कॅपिटल कॉर्पोरेशन दिल्ली या कथित वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेमार्फत केवळ ६.५ टक्के दराने सुलभरीत्या कर्ज मिळत असल्याचे कळल्याने त्यांनी कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आरोपींशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेंडे यांना कागदपत्रे पाठविली. ती बघितल्यानंतर स्वत:चे नाव अजय आणि अमन माथुर सांगणारे दोन भामटे त्यांच्या एका महिला साथीदारासह शहानिशा करण्याच्या नावाखाली १८ एप्रिलला शेंडे यांच्या घरी पोहचले. तेथे त्यांनी शेंडे यांना २५ लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर प्रारंभी १ लाख, २५ हजारांची फिक्स डिपॉजिट मागितली. ती दिल्यानंतर पुन्हा १ लाख, ७५ हजारांची सुरक्षा ठेव मागितली. पुढे वेगवेगळ्या नावाने आरोपी शेंडे यांना रक्कम आरटीजीएस करायला लावू लागले. अशा प्रकारे २५ लाखांच्या कर्जासाठी ८ लाख, १३ हजार रुपये आरोपींच्या खात्यात जमा केल्यानंतरही त्यांच्याकडून रकमेची मागणी सुरूच राहिली. त्यामुळे शेंडे यांना शंका आली. त्यांनी नातेवाईक तसेच आपल्या विश्वासू सहकाºयांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर बेलतरोडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक दिलीप साळुंके यांनी या प्रकरणाची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर मंगळवारी भादंविच्या कलम ११९, ४२०, ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६६ (क, ड) अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
फसवणुकीची ‘सुलभ’ पद्धत
लॉटरी लागली, गिफ्ट पाठवायचे आहे, नोकरी उपलब्ध आहे, असे सांगून ठिकठिकाणचे ठगबाज संबंधित व्यक्तींना मेल किंवा मेसेज पाठवितात. अनेकदा फोनही करतात. संभाषण कौशल्याच्या बळावर ते संबंधिताला जाळ्यात ओढतात. त्यानंतर मोहिनी घातल्यासारखे ‘सुलभ’ पद्धतीने ते संबंधित व्यक्तीला त्यांच्या खात्यात रक्कम भरायला भाग पाडतात.