कोणाचा काय भरवसा? रेल्वेमध्ये अनोळखींकडून खाणे-पिणे टाळा; आरपीएफकडून विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे
By नरेश डोंगरे | Published: November 23, 2023 10:06 PM2023-11-23T22:06:21+5:302023-11-23T22:06:40+5:30
हा धडा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी (आरपीएफ) अजनीतील शाळकरी मुलांना दिला.
नागपूर : रेल्वेत प्रवास करताना बाजूला बसलेल्या अनोळखी व्यक्तीने काही खायला किंवा प्यायला दिले, कितीही चांगलेपणा दाखविला आणि कितीही आग्रह धरला तर त्याला नम्रपणे नकार द्या. अन्यथा तुमच्यासोबत मोठा धोका होऊ शकतो. हा धडा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी (आरपीएफ) अजनीतील शाळकरी मुलांना दिला.
जागरूकता करायची असेल तर त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच करायला हवी. कारण शालेय जीवनात गिरवलेले धडे विद्यार्थ्यांच्या लक्षात आयुष्यभर राहतात. हे ध्यानात ठेवून आरपीएफकडून आज अजनीच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवास अन् रेल्वेशी संबंधित सुरक्षेच्या उपाययोजनांचे धडे देण्यात आले. तुम्ही एकटे, मित्रमंडळी किंवा कुटुंबीयांसोबत रेल्वेने प्रवास करीत असाल, तुमच्या बाजूला कुणी दुसरे प्रवासी बसले असेल. त्यातील कुणी महिला, पुरुष अथवा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला मोठ्या प्रेमाने काही खायला प्यायला देत असेल, आग्रह धरत असेल तरी ते घेऊ नका. त्यांना नम्रपणे नकार द्या. अन्यथा त्या चिजवस्तू तुम्ही खाल्या किंवा पिले तर तुम्ही काही वेळेनंतर बेशुद्ध पडाल. त्यानंतर पुढे कित्येक तास तुम्ही अचेत असाल. तुमच्या जिवालाही त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. या वेळेत ते आरोपी तुमच्या माैल्यवान चिजवस्तू, रोकड आणि दागिने पळवून नेतील. रेल्वे पोलिसांच्या भाषेत या प्रकाराला 'जहर खुराणी' म्हणतात. अशा घटना ठिकठिकाणी वारंवार घडतात. त्या तुमच्या सोबत होऊ नये, याची तुम्ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
दुसरे म्हणजे, तुम्ही ज्वलनशील पदार्थ सोबत घेऊन प्रवास करू नका, कुणी करत असेल तर लगेच रेल्वे स्थानक अथवा रेल्वेगाडीतील जवानांना त्याची माहिती द्या. रेल्वेगाडी येताना दिसत असेल तर तुम्ही रेल्वे रूळ (लाइन) ओलांडू नका. आवश्यक नसताना विनाकारण रेल्वेत चेन पुलिंग (साखळी ओढणे) करू नका, या आणि अशाच प्रकारच्या अनेक सुरक्षेच्या टीप्स आरपीएफने विद्यार्थ्यांना दिल्या. त्या संबंधाचे धोके सांगून काही प्रात्यक्षिकेही दाखवली.
रेल्वे गेटजवळ बसू नका
गाडीत जागा नसल्यामुळे अनेकजण रेल्वेच्या डब्याच्या दारावर (पायदानावर) बसतात. हे अत्यंत धोकादायक आहे. त्याचप्रमाणे स्टेशन आल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होतो तेव्हा अनेकजण गाडी थांबली नसूनही फलाटावर उतरण्याचा प्रयत्न करतात. हेसुद्धा जीव धोक्यात घालणारे आहे. त्यामुळे ते करू नका आणि रेल्वेशी संबंधित सर्व सुरक्षेच्या उपाययोजनांची आणि खबरदारीची माहिती आपल्या नातेवाईक तसेच मित्र परिवाराला देण्याचे आवाहनही यावेळी आरपीएफने विद्यार्थ्यांना केले.