नागपुरातील मोकाट जनावरांना आवरणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:21 PM2018-08-16T23:21:03+5:302018-08-16T23:23:14+5:30
उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असतानाच शहरातील नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु शहरात तब्बल ५६९ जनावरांचे अवैध गोठे आहेत. अशा गोठ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने शहरात मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असतानाच शहरातील नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु शहरात तब्बल ५६९ जनावरांचे अवैध गोठे आहेत. अशा गोठ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने शहरात मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनली आहे.
गाई व म्हशींचे गोठे उभारण्यासाठी दुग्धविकास विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. परंतु शहरात परवानगी न घेताच गोठे उभारले जातात. औपचारिकता म्हणून संबंधित गोपालकावर कारवाई केली जाते. कठोर कारवाई होत नसल्याने शहरातील मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोकाट जनावरांना आळा घालण्यासाठी कोंडवाडा शुल्कात दुपटीने वाढ करण्यात आली. परंतु मोकाट जनावरांना पकडण्यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने याला आळा बसलेला नाही.
अपघाताचा धोका
पावसाळ्यात शहराच्या सर्वच भागातील पशुपालक जनावरे मोकळी सोडतात. त्यामुळे शहरात गेल्या काही दिवसात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. रात्रीच्यावेळी वर्दळीच्या रस्त्यावर कोरड्या जागेत जनावरे ठिय्या मांडतात. त्यामुळे अपघात होतात. अनेकदा दुचाकी वाहनचालकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. तसेच जनावरे रस्त्यावरील हिरवळ नष्ट करतात. लावण्यात आलेल्या झाडांनाही यामुळे धोका निर्माण झाला आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मनुष्यबळाचा अभाव
कोंडवाडा विभागातर्फे मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात ठेवली जातात. जनावरे सोडण्याठी पशुपालकांना दंड आकारला जातो. परंतु जनावरे पकडण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व वाहने नसल्याने या कारवाईला मर्यादा आहेत. त्यामुळे जनावरे मोकाट सोडण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.
पोलीस कारवाई करीत नाही
जनावरे मोकाट सोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोंडवाडा विभागाने पोलीस विभागाकडे शहरातील शंभराहून अधिक पशुपालकांची यादी पाठविली आहे. परंतु पोलीस विभागाकडून कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे पशुपालकांना कायद्याचाही धाक राहिलेला नाही.
कशी होणार स्मार्ट सिटी
शहरातील रस्ते सिमेंट क्राँक्रिटचे होत आहेत. शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून रस्त्यांच्या दुभाजकावर व चौकाचौकात झाडे लावून हिरवळ निर्माण केली जात आहे. परंतु वर्दळीचे रस्ते व चौकाचौकात मोकाट जनावरे दिवसभर ठिय्या मांडतात. हिरवळ नष्ट करतात, अशा परिस्थितीत स्मार्ट सिटी कशी होणार असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.