कोण होणार अध्यक्ष... नारळीकर, सासणे की वाघमारे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:08 AM2021-01-23T04:08:57+5:302021-01-23T04:08:57+5:30
- ९४ वे साहित्य संमेलन : नारळीकरांच्या अटी महामंडळ मान्य करणार! - वि.सा. संघाकडून सासणेंचे नाव, राष्ट्रवादीचा किल्ला वाघमारेंच्या ...
- ९४ वे साहित्य संमेलन : नारळीकरांच्या अटी महामंडळ मान्य करणार!
- वि.सा. संघाकडून सासणेंचे नाव, राष्ट्रवादीचा किल्ला वाघमारेंच्या मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाशिक येथे नियोजित ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे चित्र आता जवळजवळ स्पष्ट व्हायला लागले आहे. अध्यक्षपदाचे नाव जाहीर होण्याच्या एक दिवस आधी राजकारण, साहित्यकारण आणि अट-कारणाचा खेळ रंगला आहे. जयंत नारळीकर, भारत सासणे आणि जनार्दन वाघमारे यांच्यापैकी एक नाव निश्चित होणार असून, नारळीकरांचे पारडे अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या इच्छेवरून जड ठरत आहे.
संमेलन स्थळ जाहीर होताच भारत सासणे यांचे अध्यक्षपदासाठीचे नाव अग्रक्रमाने चर्चेत आले होते. घुमान साहित्य संमेलनातील मानापमान नाट्यामुळे, महामंडळ अध्यक्षांची पसंती त्यांच्याच नावाला असल्याचेही बोलले जाते. विदर्भ साहित्य संघासाठीही आपुलकीचा विषय असल्याच्या कारणाने घटकसंस्था म्हणून भारत सासणे यांचे एकट्याचेच नाव अध्यक्षपदासाठी म्हणून सुचविण्यात आले आहे. तसे पाहता प्रत्येक घटक संस्थेला तीन नावांचे पर्याय देण्याचा अधिकार आहे. मात्र, वि.सा. संघाने दुसऱ्या कुणाचेही पर्याय देण्यापेक्षा सासणे यांच्याच नावाचा विचार केला आहे. त्यातच नाशिक साहित्य संमेलन हे यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडात होत आहे आणि छगन भुजबळ हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्याच अनुषंगाने माजी महापौर, माजी खासदार प्रसिद्ध साहित्यिक जनार्दन वाघमारे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्यांच्या नावाला भुजबळ यांचा पाठिंबा असल्याने सासणे की वाघमारे, अशा विवंचनेत महांडळ होते. त्यावर तोडगा म्हणून महामंडळाकडून प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, जागतिक कीर्तीचे संशोधक व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना आधीपासूनच विचारणा केली जात होती. वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे नारळीकरांनी प्रारंभी स्पष्ट नकार कळवला होता. मात्र, आता त्यांनी काही अटींसकट आपल्या नावाच्या प्रस्तावाला संमती दिली आहे. केवळ उद्घाटनाला ते उपस्थित राहतील, उर्वरित तीनही दिवस ते नसतील, ऑनलाईन भाषण व मुलाखत देतील, अशा त्या अटी आहेत. नारळीकर हे अध्यक्ष झाल्यास प्रथमच विज्ञान क्षेत्रातील साहित्यिकाला हा बहुमान मिळणार आहे. विशेष म्हणजे, नारळीकरांच्या नावाला कुणाचा विरोधही नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचे पारडे जड ठरत आहे.
गेल्या संमेलनात परंपरा खंडित
गेल्या संमेलनात संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ऐनवेळी प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांनी व्हीलचेअरवर उपस्थित राहून संमेलनाचे उद्घाटन केले होते आणि नंतर उपचारासाठी मुंबईला गेले होते. इतिहासात प्रथमच संमेलनाध्यक्षांच्या अनुपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला होता. यंदा नारळीकरांनी सादर केलेली अट महामंडळाने मान्य केल्यास, इतिहासाची पुनरावृत्ती लागोपाठ होणार आहे. अशा स्थितीत संमेलनाध्यक्ष पदाबाबत अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
..........