कोण होणार विद्यापीठ कुलसचिव?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:26+5:302021-07-05T04:06:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अखेरीस पूर्णवेळ नियुक्त कुलसचिव मिळणार आहेत. सोमवार व मंगळवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अखेरीस पूर्णवेळ नियुक्त कुलसचिव मिळणार आहेत. सोमवार व मंगळवारी कुलसचिव पदासाठी मुलाखती होणार आहे. या पदावर निवड व्हावी, यासाठी अनेक अनुभवी उमेदवार रिंगणात आहेत. काही उमेदवार स्वत:च्या कर्तृत्वावर तर काही उमेदवार राजकीय माध्यमातून नियुक्ती होईल, या आशेवर आहेत. तब्बल ४६ उमेदवार रिंगणात असून, मंगळवार किंवा बुधवारी नाव अंतिम होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठाचे कुलसचिवपद नेहमीच चर्चेत असते. डॉ. अशोक गोमाशे यांनी मुदत पूर्ण होण्याअगोदरच राजीनामा दिला होता. त्यानंतर डॉ. पूरण मेश्राम यांच्याकडे पदाची धुरा आली. परंतु न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांनादेखील पदाचा राजीनामा द्यावा लागला. डॉ. नीरज खटी यांच्याकडे प्रभारी जबाबदारी होती. २०१९ मध्ये झालेल्या कुलसचिवपदाच्या मुलाखतींमध्ये डॉ. नीरज खटी यांचीच निवड झाली होती. मात्र डॉ. खटी यांनी तांत्रिक कारणे देत पद स्वीकारण्यास असमर्थतता दाखविली. त्यानंतर अचानकपणे डॉ. अनिल हिरेखण यांची या पदावर राज्य शासनातर्फेच नियुक्ती करण्यात आली. याबाबत विद्यापीठ वर्तुळात अनेकांची आश्चर्य व्यक्त केले होते व राज्य शासनाचा हस्तक्षेप असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेरीस विद्यापीठाने कुलसचिवपदाच्या भरतीसाठी जाहिरात काढली.
महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज केले. यात प्रामुख्याने कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे, एआयसीटीईचे सल्लागार डॉ. राजेंद्र काकडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. अभय मुद्गल, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. अरविंद जोशी, भूषण महाजन, डॉ. श्याम कोरेटी इत्यादींचा समावेश आहे.
राजकीय धावाधाव
कुलसचिव पदाच्या मुलाखतीच्या अगोदर अनेक उमेदवारांची राजकीय धावाधाव सुरू होती. कुणी राज्यातील मंत्र्यांकडे शब्द टाकला आहे, तर काही उमेदवारांनी शिक्षण मंचाच्या माध्यमातून दावा केला आहे. शिक्षण मंचानेदेखील पूर्ण ताकद पणाला लावली आहे. अशा स्थितीत निवड समिती राजकीय संबंधांना जास्त महत्त्व देते की खरोखर क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी मिळणार, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.