कौन बनेगा जॉईंट सीपी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:29 AM2020-11-22T09:29:19+5:302020-11-22T09:29:19+5:30
नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेले नागपूरच्या सहपोलीस आयुक्ताचे पद गेल्या ...
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेले नागपूरच्या सहपोलीस आयुक्ताचे पद
गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त आहे. गृहमंत्र्यांच्या होमटाऊनमधील गुन्हेगारी उसळी मारत असताना पोलीस दलातील अत्यंत महत्त्वाच्या या पदावर कोणता अधिकारी बदलून यायला तयार नाही, की या पदावर नियुक्त करण्यात गृहमंत्रालय, पोलीस महासंचालनालयाला स्वारस्य नाही, असा प्रश्न त्यामुळे चर्चेला आला आहे.
आयुक्तालय असलेल्या शहरात पोलीस दलाचा कणा म्हणजे सहपोलीस आयुक्ताचे पद. या पदावर असलेल्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. त्यासंबंधाने अनेक महत्त्वाचे निर्णय डे टू डे घेण्याचाही अधिकार सहपोलीस आयुक्तांना असतो. गुन्हेगारी नियंत्रण, छोट्या-मोठ्या अवैध धंद्यांचे निष्काषण या संबंधीचेही निर्णायक अधिकार सहपोलीस आयुक्तांकडे असतात. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराने राज्याला सलग आणि पूर्णवेळ दोन गृहमंत्री दिलेले आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांचे होमटाऊन म्हणूनही नागपूरची ओळख आहे. अशा या नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी उसळी मारू लागली आहे. शहरात गेल्या दोन आठवड्यात नागपुरात हत्येच्या ९ घटना घडल्या. जयताळ्यात हात नसलेल्या अवस्थेत विवस्त्र महिलेचा मृतदेह आढळला, हादेखील हत्येचाच प्रकार असावा, असा संशय आहे. हाणामाऱ्या, लुटमारीच्या घटनाही वाढल्या आहेत.
येथील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कर्तव्यकठोर आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून अल्पावधीतच ओळख अन् स्वत:चा धाकही निर्माण केला आहे. शहराच्या पोलीस दलाचे प्रमुख म्हणून त्यांना दुसऱ्याही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे त्यांच्या हाताशी सहपोलीस आयुक्त असणे अत्यंत आवश्यक आहे. असे असताना येथील सहपोलीस आयुक्तांचे पद तब्बल सहा महिन्यांपासून रिक्त असण्यामागचे कारण कळायला मार्ग नाही. या संबंधाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
---
अतिरिक्त आयुक्तांकडे प्रभार
यापूर्वी येथे सहपोलीस आयुक्त म्हणून रवींद्र कदम ३१ मे रोजी सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर या पदाचा भार तेव्हाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी सांभाळला. सध्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी या पदाचा प्रभार सांभाळत आहेत. गेल्या दोन महिन्यात राज्य पोलीस दलात अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. नागपुरातही अनेक अधिकारी बदलून आले आणि येथून काही अधिकारी दुसरीकडे बदलूनही गेले. मात्र, खुद्द गृहमंत्र्यांच्या शहरात सहपोलीस आयुक्त म्हणून कोणत्याही अधिकाऱ्याला नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे येथे कुणी या पदावर यायला तयार नाही की गृहमंत्रालय येथे कुणाला पाठवायला तयार नाही, असा प्रश्न चर्चेला आला आहे.
---