बहिष्कृततेच्या बेड्या तोडणार कोण?
By admin | Published: May 5, 2017 02:40 AM2017-05-05T02:40:46+5:302017-05-05T02:40:46+5:30
समाजशील असलेल्या मनुष्यासोबतचे व्यवहारच बंद झाले तर तो जगणार तरी कसा, असा प्रश्न सध्या गोटाळी (मालेवाडा) येथील १० कुटुंबांना पडला आहे.
भिवापूर तालुक्याच्या गोटाळीतील १० कुटुंब उपोषणावर : स्वत:च्या समाजानेच झिडकारले
अभय लांजेवार उमरेड
समाजशील असलेल्या मनुष्यासोबतचे व्यवहारच बंद झाले तर तो जगणार तरी कसा, असा प्रश्न सध्या गोटाळी (मालेवाडा) येथील १० कुटुंबांना पडला आहे. स्वत:च्या जाती-धर्मातील लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला असल्याने न्याय मागावा तरी कुणापुढे, हा प्रश्न त्यांना व्यथित करतो आहे. त्या १० कुटुंबांने सर्वत्र दाद मागितली. परंतु त्यांना निराशाच आली. अखेर त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. दुसरीकडे, त्यांच्यावर टाकलेल्या बहिष्काराचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच गुरुवारी प्रशासनाने गावाकडे धाव घेतली. असे असले तरी बहिष्कृततेच्या बेड्या अद्याप कुणीही तोडू शकला नाही.
मालेवाडा हे १,८५४ लोकसंख्येचे गाव आहे. भिसी - चिमूर मार्गावर असलेल्या या गावाच्या एक किलोमीटर आधी गोटाळी (मालेवाडा) ही सुमारे २५० जणांची लोकवस्ती आहे. येथे अनुसूचित जातीची ३५ कुटुंबे वास्तव्याला आहेत. सर्व समाजाची एकूण ५० कुटुंब या वस्तीत राहतात. ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव मालेवाडा ग्रामपंचायत’ असा मानाचा तुरा या गावाच्या शिरपेचात लागलेला दिसतो. दुसरीकडे तंटामुक्त गावाचा फलक मोडकळीस आलेला, वाकलेल्या अवस्थेत कसाबसा उभा आहे. एकंदरच या फलकावरून गोटाळी (मालेवाडा) या वस्तीची झालेली दशा आणि दुर्दशा चित्रित होते. तंटामुक्त गावात हा प्रकार निंदनीय असल्याचेही आता बोलले जात आहे.
आपल्याला नेहमीच वाळीत टाकण्याचा कटू अनुभव वाट्याला येतोय.
सातत्याने तीन वर्षापासून मानसिकरीत्या त्रास देण्याचे कार्य सुरू असून यावर तोडगाच निघत नसल्याने अखेरीस या दहा कुटुंबीयांनी साखळी उपोषणाच्या माध्यमातून आपल्या वेदना, व्यथा आणि दु:ख शासन प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
२ मे पासून गावातच उपोषण सुरू झाले असून या न्यायिक लढ्यास यश आले नाही तर आमरण उपोषणाचाही इशारा या दहा कुटुंबीयांनी दिला आहे.
पुढाकार कोण घेणार?
तीन वर्षापासून सुरू असलेला हा प्रकार जात पंचायतीच्या पातळीवरील तर नव्हे, अशी कुजबुज सुरू झाली आहे. ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण २०१६’ हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले. हे विधेयक राज्यात सामाजिक न्यायाची नवी पहाट आणेल, असा विश्वास व्यक्त होत असताना गोटाळी (मालेवाडा) येथील प्रकरण ‘सामाजिक चिंतन’ करायला लावणारे आहे. याप्रकरणी पुढाकार कोण घेणार, असा सवाल विचारला जात असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत क्षुल्लक कारणावरून बहिष्काराची भाषा कशी वापरू शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.
संवेदनशून्य समाज
एरवी सोशल मीडियावर एखादी चुकीची पोस्ट जरी सोडली तर बेधडकपणे खरमरीत टीका टिप्पणी करीत चिरफाड सुरू होते. अनेकजण अक्षरश: तुटून पडतात. दुसरीकडे १० कुटुंब चक्क तीन वर्षापासून बहिष्कृत आयुष्याचे चटके सोसत आहेत. आज केवळ लोकमतने वृत्त प्रकाशित करताच अनेकांच्या संवेदना जाग्या झाल्या हे खरे असले तरी संवेदनशून्य समाजात आपण जगत आहोत, असाच भास आम्हास होतोय, अशी खंत उपोषणकर्त्यांची आहे.
लोकप्रतिनिधींची पाठ
लोकमतने ‘दहा कुटुबीयांना केले बहिष्कृत’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. आजच्या ‘डिजिटल’ युगातही या घटना घडत आहेत, यावर तिखट प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या. सकाळपासूनच शासकीय यंत्रणाही कागदपत्र रंगविण्याच्या कामाला लागली. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त व्ही. एम. वाकुलकर, दहशतवाद विरोधी पथक नागपूरचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. खोकले, भिवापूरचे तहसीलदार डी. जी. जाधव, ठाणेदार रवींद्र दुबे, मंडळ अधिकारी एन. डी. कावळे, तलाठी पी. व्ही. दख्खनकार आदींनी उपोषणस्थळी भेट दिली. काही बड्या अधिकाऱ्यांचा अपवाद वगळता अधिकारी आले असले तरी लोकप्रतिनिधींनी मात्र याकडे पाठ दाखविली. जिल्हा परिषद सदस्या दीपाली इंगोले या मालेवाडा येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. परंतु त्यांनीसुद्धा उपोषण स्थळाकडे ढुंकूनही बघितले नाही. सध्या कोणत्याही निवडणुका तोंडावर नसल्याने लोकप्रतिनिधींचे याठिकाणी काम नाही, असाही संताप व्यक्त होत आहे.
हेच काम आहे का?
२ मे पासून साखळी उपोषण सुरू झाले. पहिल्या दिवशी दोन पुरुष आणि सहा महिला साखळी उपोषणाला बसल्या. पोलीस विभागालाही याबाबतचे पत्र देण्यात आले. आम्हाला संरक्षण हवे अशी विनंतीही काही महिलांनी केली. अशातच सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र दुबे यांनी ‘पोलिसांना हेच काम आहे का’, अशा शब्दात बुधवारी आपला पोलिसी खाक्या दाखविला.
म्हणे बदनामी होते
गुरुवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या काही समाजबांधवानी उपोषणस्थळ गाठले. ‘तुमचे असे करणे (उपोषण) बरोबर नाही. आपल्या समाजाची बदनामी होते. मंडप उचलून टाका’, असा फुकटचा सल्ला उपोषणकर्त्यांना दिला. समाजातील माणसेच अस्पृश्यता पाळत असतील तर मग आम्ही काय करायचे. तुमचे अशा पद्धतीने बोलणे बरोबर नाही, अशा शब्दात उपोषणकर्त्यांनी त्यांना खडे बोल सुनावले. ‘ती’ आलेली ‘आपली माणसं’ नेमकी कशासाठी आली होती, असाही प्रश्न उपोषणकर्त्यांना यावेळी पडला.