नागपुरातल्या कळमना फळ बाजारातील गर्दीवर कोण नियंत्रण आणणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 08:30 PM2020-04-10T20:30:39+5:302020-04-10T20:32:05+5:30
कळमन्यातील कृषी उत्पन्न समितीच्या फळ बाजारात शुक्रवारी किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी फळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संत्र्याचा लिलावासाठी व्यापारी आणि अडतियांची यार्डमध्ये गर्दी होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उठाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमन्यातील कृषी उत्पन्न समितीच्या फळ बाजारात शुक्रवारी फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यासोबतच शहरातील किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी फळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संत्र्याचा लिलावासाठी व्यापारी आणि अडतियांची यार्डमध्ये गर्दी होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उठाला. शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना कळमन्यातील फळ बाजारातील गर्दीवर कोण नियंत्रण आणणार, हा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
मुंबई येथील कृृषी उत्पन्न समितीचा बाजार गुरुवारपासून आणि पुणे येथील बाजार शुक्रवारपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दोन्ही मोठे बाजार प्रशासन बंद करू शकतात, तर नागपूरचा बाजार का नाही, असा सवाल व्यापारी आणि अडतियांनी केला आहे. या बाजारात गर्दी टाळण्यासाठी मध्यंतरी सहा दिवस फळे बाजार बंद करण्याचा निर्णय कळमना फळे बाजाराच्या अडतिया असोसिएशनने घेतला आणि बाजार बंद केला होता. पण त्यावर राज्य शासनाच्या पणन महासंघाने आक्षेप घेऊन व्यापारी आणि अडतियांना परवाने रद्द करण्याची तंबी दिली होती. त्यानंतर बाजार सुरू करण्यात आला. पण गर्दी ‘जैसे थे’ आहे.
असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे लोकमतला म्हणाले, कळमना भाजी बाजारात किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी गर्दी पाहता प्रशासनाने निर्णय घेत दरदिवशी १०० गाड्या आणि ५० अडतियांनी व्यवसाय करण्याची परवानगी दिली. उर्वरित उत्पादक शेतकऱ्यांच्या गाड्यांना नागपुरातील विविध बाजारात भाज्या विक्रीची मुभा दिली. त्यानुसारच फळे बाजाराची व्यवस्था असावी. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांच्याकडे ही मागणी लावून धरली आहे. पण त्यांनी यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. बाजारात एखादी घटना घडल्यास प्रशासकाचे डोळे उघडणार काय, असा सवाल डोंगरे यांनी केला. शुक्रवारी बाजारात फळांची आवक वाढल्यानंतर कुणीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळताना दिसले नाहीत. दररोज हीच परिस्थिती उद्भवत आहे. भाज्या उत्पादकांप्रमाणेच फळ उत्पादकांनाही शहरातील बाजारांमध्ये फळे विक्रीची परवानगी द्यावी आणि हा बाजार काही दिवसांसाठी बंद करावा, असे डोंगरे यांनी सुचविले आहे.
गर्दीवर आवक घालण्यात आम्ही अपयशी ठरत असल्याचे प्रशासक राजेश भुसारी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले आहे. पण बाजाराचे नियमित सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. मापाडी आणि मजूरांना मास्क देण्यात आल्याचे सांगितले आहे. पण बाजार बंद करण्याच्या प्रश्नावर शुक्रवारी भुसारी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही.