नागपुरातील या मोकाट कुत्र्यांना आवरणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 08:45 PM2019-11-30T20:45:23+5:302019-11-30T20:48:15+5:30
शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांमुळे वाहन चालकांमध्ये दहशत पसरली आहे. किरकोळ अपघातासह गंभीर अपघातही वाढले आहेत. रात्रीला रस्त्यावर फिरणाऱ्या या कुत्र्यांना आवारणार कोण? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्रीच्या सुमारास रस्त्यांवर झुंडीत राहणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे जीवघेणे अपघात वाढले आहेत. शहरातील रस्त्यावर या मोकाट कुत्र्यांमुळे वाहन चालकांमध्ये दहशत पसरली आहे. किरकोळ अपघातासह गंभीर अपघातही वाढले आहेत. रात्रीला रस्त्यावर फिरणाऱ्या या कुत्र्यांना आवारणार कोण? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
शहरातील बहुतांश मुख्य रस्त्यावर विशेषत: मटन मार्के ट असलेल्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. ही कुत्री रात्रीला रस्त्यावर उभी असतात. पळापळी करीत असतात. कधी धावत्या वाहनांवर हल्ला करतात तर कधी वाहनांच्या खाली येऊन अपघाताचे कारण ठरतात. मोठ्या वाहनांखाली आल्याने कधी कुत्र्यांचा जीव जातो, अन्यथा वाहने असंतुलित होऊन मोठा अपघात घडतो. मोकाट कुत्र्यांमुळे या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शहरातील वर्धा रोडवर, मानकापूर आरयूबीच्याजवळ, तुकडोजी ते मानेवाडा चौक, रिंगरोड, वेस्ट हायकोर्ट रोड, धरमपेठ, सीए रोड, सोबतच गल्लीबोळीतसुद्धा कुत्र्यांचा वावर वाढला आहे. विशेष म्हणजे कचऱ्याच्या ठिकाणी ही कुत्री मोठ्या संख्येने असतात. वाहनांवर धावणे, वाहनांखाली आल्याने वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहे. रात्रीला रस्त्यावर फिरणाऱ्या या मोकाट कुत्र्यांना आवरणे अवघड झाले आहे.