बाजारातील सुपर स्प्रेडर्सना कोण आवरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:07 AM2021-04-06T04:07:02+5:302021-04-06T04:07:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात कोरोना संक्रमणामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी नियमांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात कोरोना संक्रमणामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी व बाजारातील गर्दी टाळा, अनावश्यक ठिकाणी जाण्याचे टाळा, गरज असेल तरच घराबाहेर पडा, मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवा असे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. परंतु बाजारातील गर्दी कायम असल्याचे चित्र आहे. रविवारी शहरातील आठवडी बाजारात याचा प्रत्यय आला. खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
कोरोबा बाधितांचा आकडा मार्चपासून झपाट्याने वाढत आहे. सोबतच वाढते मृत्यू ही चिंतेची बाब आहे. संक्रमण रोखण्यासाठी शनिवार, रविवार बाजार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु होळीपासून नवीन निर्बंध लागू करण्यात आले. शनिवार व रविवार पुन्हा बाजारात गर्दी व्हायला लागली. सक्करदरा येथील बुधवार बाजारात बुधवारी व रविवारी खरेदीसाठी गर्दी होते. असेच चित्र शहराच्या इतर भागातही आहे. बाजारात अनेकजण मास्कचा वापर करत नाहीत. हेच सुपर स्प्रेडर्सची भूमिका पार पाडत आहेत.
बाजारात खरेदी करताना सुरक्षित अंतर ठेवले जात नाही. त्यात काहींच्या तोडाला मास्क बांधलेले नसतात. बाजारात काही महिला लहान मुलांना सोबत आणून आपल्या सोबत त्यांचाही जीव धोक्यात घालतात.
...
पोलीस वा पथकाचे जवान नसतात
आठवडी बाजरात होणारी गर्दी विचारात घेता मनपाचे उपद्रव शोध पथक व पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु बाजारात पथकाचे जवान वा पोलीस नसतात. यामुळे लोकांनाही कारवाईची भीती राहिलेली नाही. याकडे मनपा व पाेलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
........
दंडात्मक कारवाईची भीती नाही
विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस व मनपाच्या उपद्रव शोध पथकामार्फत कारवाई सुरू आहे. ५०० रुपये दंड आकारला जात आहे. दंडाची भीती निर्माण व्हावी, म्हणून दंड २०० रुपयांवरून ५०० करण्यात आला. परंतु त्यानंतरही अनेक जण मास्कचा वापर करत नाहीत. दंडाच्या रकमेत आणखी वाढ करण्याची गरज आहे.