इलेक्ट्रिक केबल टाकण्यासाठी खोदलेला रोड बुजविणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 06:45 PM2024-11-05T18:45:43+5:302024-11-05T18:47:24+5:30

अपघातांना निमंत्रण : काटोल - सावरगाव मार्गावरील प्रकार

Who will dig the road dug to lay the electric cable? | इलेक्ट्रिक केबल टाकण्यासाठी खोदलेला रोड बुजविणार कोण?

Who will dig the road dug to lay the electric cable?

सौरभ ढोरे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
काटोल :
कंत्राटदाराने इलेक्ट्रिक केबल टाकण्यासाठी काटोल- सावरगाव मार्गावरील शासकीय आयटीआयजवळ रोडवर आडवे खोदकाम करीत नाली तयार केली. केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ती नाली मात्र बुजविली नाही. सध्या ती नाली अपघातांना निमंत्रण देत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी मूक दर्शक बनून मोठ्या अपघाताची प्रतीक्षा करीत आहेत का, असा प्रश्न वाहन चालकांसह नागरिकांनी उपस्थित केला आहे.


काटोल-सावरगाव हा मार्ग नागपूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांसोबत मध्य प्रदेशला जोडणारा असल्याने या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. काही दिवसांपूर्वी या भागात इलेक्ट्रिक केबल टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी कंत्राटदाराने या रोडवर आडवे खोदकाम करीत खोली नाली तयार केली आणि आत केबल टाकून त्यावर थोडाफार मुरूम व माती टाकली. सध्या या ठिकाणी नाली तयार झाली आहे. या खोदकामासाठी कंत्राटदाराला नेमकी कुणी व कोणत्या अटीवर परवानगी दिली, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी शब्दही बोलायला तयार नाहीत. 


या खोदकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य व इतर अभियंत्यांकडे विचारणा केली. मात्र, कुणालाही या खोदकामाची माहिती नसल्याचे त्यांच्याशी केलेल्या चर्चेवरून लक्षात आले. त्यामुळे कंत्राटदार अथवा त्याच्या कंपनीने या खोदकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकृत परवानगी घेतली की नाही, ते खोदकाम कोणत्या कंत्राटदाराने केले, हेदेखील अभियंते सांगायला तयार नाही. दुसरीकडे, या खोदकामाची निरपेक्ष चौकशी करून दोषी कंत्राटदाराविरुद्ध पोलिसात तक्रार करून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


उपाययोजना शून्य 
ही नाली व्यवस्थित बुजवून रोड समांतर करण्याची तसदी कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही. ही नाली वाहनचालकांना दिवसा व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे नालीतून वाहन जाताच ते उसळते आणि अपघात होतात. शुक्रवारी रात्री एक दुचाकीचालक या नालीमुळे जखमी झाला. येथील छोटे-मोठे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना केल्या नाहीत.


उंटावरून शेळ्या हाकण्याच्या प्रकार
या खोदकामाला परवानगी दिल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सुमित आवळे यांनी अप्रत्यक्ष मान्य केले आहे. खोदकाम केल्यानंतर ते व्यवस्थित बुजविले की नाही, याच प्रत्यक्ष पाहणी मात्र त्यांनी अजूनही केली नाही. याच परिसरात सिमेंट काँक्रीट रोडचे काम सुरू आहे. त्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी सुमित आवळे यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. परंतु, त्यांनी या तक्रारींची घेतली नाही व बांधकामाची पाहणी केली नाही. ते उंटावरून शेळ्या हाकत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.


"हा रोड आमच्या अखत्यारीत येतो. या भागातील सिव्हर ट्रीटमेंट प्लांटसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यांना रोड खोदला असेल तर त्याची संपूर्ण देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली आहे." 
- सुमित आवळे, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, काटोल.

Web Title: Who will dig the road dug to lay the electric cable?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.