विधान परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटकेंच्या जागी संधी कुणाला?
By कमलेश वानखेडे | Published: November 27, 2024 03:37 PM2024-11-27T15:37:04+5:302024-11-27T15:42:10+5:30
संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, संजय भेंडे, डॉ. राजीव पोतदार, सुधाकर कोहळे या नेत्यांची नावे स्पर्धेत आहेत.
कमलेश वानखेडे, नागपूर
विधान परिषदेवर सदस्य असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे व आ. प्रवीण दटके यावेळी विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत. विधानसभेवर निवडून आल्यानंतर ४० दिवसांत विधान परिषदेचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे आता या रिक्त झालेल्या दोन जागांवर आपली वर्णी लावण्यासाठी भाजपमधील इच्छुक आतापासून सरसावले आहेत.
बावनकुळे हे विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झाले होते. नागपूर महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. बहुतांश जागी प्रशासक आहे. त्यामुळे या निवडणुका झाल्यानंतरच बावनकुळे यांच्या रिक्त जागेवर निवडणूक होईल. तर प्रवीण दटके हे आमदारांच्या कोट्यातून विजयी निवडले गेले होते. दटके यांचा कार्यकाळ जून २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे सरकार स्थापनेनंतर काही दिवसातच या जागेवर निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.
या दोन जागांसाठी माजी महापौर संदीप जोशी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, भाजप नेते संजय भेंडे, प्रदेश प्रतिनिधी डॉ. राजीव पोतदार यांच्या नावांवर विचार होऊ शकतो. संदीप जोशी हे पश्चिम नागपुरातून लढण्यासाठी इच्छुक होते. माजी आ. सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समर्थकांनी जोशी यांच्या घरासमोर ठिय्या देत घोषणाबाजी केली होती.
पश्चिम नागपुरात यावेळी हिंदी भाषिक उमेदवार द्यावा, असाही आग्रह धरण्यात आला. मध्य नागपुरातून आपले घरदार सोडून दयाशंकर तिवारी पश्चिम नागपुरात दोन वर्षांपासून स्थायिक झाले होते. पण त्यांचीही संधी हुकली. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. ऐनवेळी त्यांना पश्चिम नागपूरच्या मैदानात उतरविण्यात आले. त्यांनी चांगली लढत दिली. पण जिंकू शकले नाहीत. त्यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो, असे पक्षातील उच्चपदस्थांचे म्हणणे आहे.
मध्य नागपुरातील हलबा समाजाचे असलेले माजी आ. विकास कुंभारे रे यांचे तिकीट कापून आ. प्रवीण दटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे हलबा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी या समाजाला प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते. यात माजी नगरसेवक कल्पक भानारकर यांच्या नावावर विचार होऊ शकतो, अशी माहिती आहे.
अन् पोतदारांनी पालकत्व स्वीकारले
डॉ. राजीव पोतदार हे पुन्हा एकदा सावनेर मतदारसंघासाठी इच्छुक होते. पण पक्षाने डॉ. आशिष देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर डॉ. राजीव पोतदार यांनी या मतदरसंघाचे पालकत्व स्वीकारले व प्रचाराची रणनिती आखली. या मतदारसंघात कमळ फुलवण्यात त्यांना यश आले. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतच त्यांचे नाव येणे अपेक्षित होते. पण त्यावेळीही संधी हुकली. यावेळी डॉ. पोतदार यांचा दावा बळकट मानला जात आहे.
सामाजिक समीकरणांचा विचार होणार
बावनकुळे व दटके यांच्या जागेवर संधी देताना सामाजिक समीकरणांचा निश्चितच विचार केला जाईल, असे मत पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. ज्यांना विधानसभा निवडणुकीत भविष्यातही संधी मिळू शकत नाही, अशांचा यावेळी विचार होईल, असा दावाही संबंधित नेत्याने केला आहे.