मतदारवाढीचा फायदा कुणाला मिळणार?
By admin | Published: February 17, 2017 02:48 AM2017-02-17T02:48:28+5:302017-02-17T02:48:28+5:30
नागपूर महानगरपालिका निवडणुकांना अवघे काही दिवस राहिले असताना राजकीय पक्षांमधील आकडेतज्ज्ञ अपेक्षित जागांचे गणित जुळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मतदानदेखील वाढण्याची शक्यता : अपक्षांच्या मतांवर राजकीय समीकरण अवलंबून राहणार
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकांना अवघे काही दिवस राहिले असताना राजकीय पक्षांमधील आकडेतज्ज्ञ अपेक्षित जागांचे गणित जुळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा वाढलेल्या मतदारांची संख्या आणि देशभरात वाढणारी मतदानाची टक्केवारी लक्षात घेता, चमत्कार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच विविध पक्षांतील बंडखोरांनी अपक्ष म्हणून आव्हान उभे केल्यामुळे त्यांना जाणाऱ्या मतांवर राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. मतदारवाढीचा फायदा नेमका कुठल्या पक्षाला मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२०१२ साली नागपूर शहरातील मतदारांची संख्या १९ लाख ८६ हजार ५७ इतकी होती. यंदा ही संख्या २० लाख ९३ हजार ३९३ इतकी झाली आहे. २०१२ च्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत १ लाख ७ हजार ३३६ इतकी वाढ झाली आहे. जर प्रभागनिहाय रचना लक्षात घेतली, तर प्रत्येक प्रभागात सरासरी २ हजार ८२४ व प्रत्येक जागेमागे सुमारे ७१० मतदार वाढले आहेत. ही संख्या निश्चितच मोठी असून अटीतटीच्या लढती होणाऱ्या ठिकाणी तर हे नवमतदार मौलिक भूमिका पार पाडणार आहेत.
दुसरीकडे गेल्या काही काळापासून देशभरातील विविध निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी सातत्याने वाढते आहे. निवडणूक आयोगाने केलेले प्रयत्न व राजकीय पक्षांचा पुढाकार यामुळे नागपुरातदेखील मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. मागील वेळेस नागपूर मनपा निवडणुकांत ५२ टक्के मतदान झाले होते. यंदा हेच प्रमाण ८ ते १५ टक्क्यांनी जरी वाढले तरी मोठा उलटफेर होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.
मागील निवडणुकांत भाजपा व कॉंग्रेस यांच्यातील मतांच्या टक्केवारीचा फरक हा अवघा ४.६२ टक्के इतका होता. त्यामुळे मतदान आणि मतदार वाढीचा फायदा नेमका कुणाला मिळणार, याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत.
अपक्षांच्या जागा वाढणार की घटणार ?
नवीन प्रभागपद्धतीमुळे फारसे अपक्ष निवडणुकांच्या रिंगणात उभे राहणारच नाही, अशी मोठ्या राजकीय पक्षांची धारणा होती. मात्र काँग्रेस, भाजपामध्ये तिकीटवाटपानंतर मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली व पक्षातील कार्यकर्त्यांनीच अपक्ष म्हणून आव्हान उभे केले. यंदा थोडेथोडके नव्हे तर ३०२ अपक्ष उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात आहेत. मागील निवडणुकांत १० अपक्षांनी विजय मिळविला होता व अपक्षांना झालेल्या एकूण मतदानाची संख्या १७.६९ टक्के इतकी होती. यंदा अपक्षांच्या जागा वाढणार की घटणार याबाबत विविध मतप्रवाह असले तरी मतांच्या टक्केवारीमध्ये घट झाली, तर निकालांत चमत्कार दिसून येऊ शकतात.