आता या फटाक्यांचा कचरा उचलणार कोण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 09:14 PM2018-11-08T21:14:24+5:302018-11-08T21:18:15+5:30
जेव्हा फटाक्यांचा आनंद आपण लुटतो, तेव्हा त्यापासून निर्माण होणारा कचराही साफ करण्याची आपलीच जबाबदारी आहे. परंतु, गुरुवारी उपराजधानीतील नंदनवन, हुडकेश्वर, दक्षिण नागपूर, कळमना, रामदासपेठ, सक्करदरा अशा विविध भागातील रस्त्यांची पाहणी लोकमतच्या चमूने केली असता स्त्यांवर फुटलेल्या फटाक्यांचा कचरा पडून दिसला. दुपारपर्यंत हा कचरा तसाच पडून असल्यामुळे फटाक्यांचा हा कचरा उचलणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जेव्हा फटाक्यांचा आनंद आपण लुटतो, तेव्हा त्यापासून निर्माण होणारा कचराही साफ करण्याची आपलीच जबाबदारी आहे. परंतु, गुरुवारी उपराजधानीतील नंदनवन, हुडकेश्वर, दक्षिण नागपूर, कळमना, रामदासपेठ, सक्करदरा अशा विविध भागातील रस्त्यांची पाहणी लोकमतच्या चमूने केली असता स्त्यांवर फुटलेल्या फटाक्यांचा कचरा पडून दिसला. दुपारपर्यंत हा कचरा तसाच पडून असल्यामुळे फटाक्यांचा हा कचरा उचलणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला.
बुधवारी लक्ष्मीपूजनाला घरोघरी वस्त्यावस्त्यांमध्ये फटाके फुटले. फ्लॅट स्कीममध्ये फटाके फोडण्यास जागा नसल्याने, लोकांनी रस्त्यावर येऊन फटाके फोडले. त्यामुळे रस्त्यावर फटाक्यांचा कचरा झाला. गुरुवारी सकाळपासून मनपाचे सफाई कर्मचारी गल्लोगल्लीत झालेला कचरा साफ करण्यासाठी कामाला लागले. मुख्य रस्त्यांवरील कचरा त्यांनी साफ केला. परंतु कचरा जास्त असल्याने प्रत्येक ठिकाणी ते पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे कचरा दिवसभर तसाच पडून होता. विशेष म्हणजे फटाक्यांचा झालेला कचरा हा घातकच असतो. त्याला बारुद लागलेली असते. जनावरे ती खात असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. परंतु तरीसुद्धा गुरुवारी दुपारपर्यंत हा कचरा उचलण्यात आला नाही.
रामदासपेठेत रस्त्यावर कचरा
रामदासपेठ परिसरातील सेंट्रल बाजार रोडच्या मागील रस्त्यावर ठिकठिकाणी फटाक्यांचा कचरा साचलेला दिसला. फ्लॅट स्कीममध्ये फटाके फोडण्यासाठी जागा नसल्यामुळे अनेक नागरिकांनी बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रस्त्यावर येऊन फटाके फोडले. त्यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत हा कचरा तसाच रस्त्यावर पडून होता. दगडी पार्क परिसरातही रस्त्यांवर फटाक्यांचा कचरा दुपारपर्यंत पडून असलेला दिसला.
पिपळा रोड परिसरात कचऱ्याचे ढीग
पिपळा रोड परिसरात रस्त्यांवर फटाक्यांचा कचरा साचलेला दिसला. ढगे यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर फटाक्यांचा कचरा साचला होता. गुरुवारी सकाळी ७ वाजता या भागाची पाहणी केली असता सर्वत्र रस्त्यावर फटाक्यांचा कचरा साचला होता. या परिसरातील अनेक महिला फटाक्यांचा कचरा गोळा करून जाळत असल्याचे चित्र दृष्टीस पडले.
हुडकेश्वर भागात साचला कचरा
हुडकेश्वर परिसरातही अनेक भागात रस्त्यांवर फटाक्यांचा कचरा गुरुवारी दुपारर्यंत तसाच पडून होता. हुडकेश्वर मुख्य रस्त्यावरही हीच परिस्थिती पहावयास मिळाली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या समोरील रस्त्यावर तसेच दुबेनगर परिसरातील रस्त्यांवरही फटाक्यांचा कचरा दुपारपर्यंत पडून असल्याचे पहावयास मिळाले.
फ्लॅट स्कीमसमोर कचरा
धंतोली परिसरात सर्वत्र फटाक्यांचा कचरा साचल्याचे दिसले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असंख्य नागरिकांनी आपल्या घरासमोर, फ्लॅट स्कीमच्या समोरील रस्त्यांवर फटाके फोडले. या भागातील प्रत्येक घरासमोर आणि फ्लॅट स्कीमसमोर फटाक्यांचा कचरा साचलेला दिसला.
धरमपेठ, सिव्हिल लाईन्समध्ये फटाक्यांचा कचरा
धरमपेठ, गोरेपेठ, सिव्हिल लाईन्स, भरतनगर, रविनगरातील नागरिकांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके फोडल्यामुळे या भागात कचरा साचलेला दिसला. हा कचरा रस्त्यावर, रस्त्याच्या दुतर्फा पडून होता. फ्लॅट स्कीममधील नागरिकांनी रस्त्यावर येऊन फटाके फोडल्यामुळे हा कचरा तसाच पडून होता.
डिप्टी सिग्नल परिसर कचरामय
डिप्टी सिग्नल, चिखली ले आऊट परिसरात सर्वत्र फटाक्यांचा कचरा पडून होता. या भागात आरामशीन, दाल मिल आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने अधिक आहेत. लक्ष्मीपूजनानिमित्त व्यावसायिकांनी फोडलेल्या फटाक्यांचा कचरा रस्त्यावर पडून होता. दुपारपर्यंत हा कचरा उचलण्यात आला नाही.नेताजीनगर, सुभाननगर, निवृत्तीनगर, गुजराती कॉलनी या भागात काही नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावरील कचरा झाडून तो जाळला. परंतु अनेक भागात कचऱ्याचे ढीग दिसले.
डिव्हायडरवर कचरा
वर्धमाननगर चौकात डिव्हायडरवर आंब्याची पाने, केळीचे खांब पडून असलेले दिसले. याशिवाय फटाक्यांच्या कचऱ्याचे ढीगही साचलेले होते. दुपारपर्यंत हा कचरा उचलण्यात आलेला नव्हता.
बगडगंज भागातही साचला कचरा
बगडगंज परिसरातील छाप्रुनगर, कुंभारटोली परिसरात रस्त्याच्या बाजूला फटाक्यांचा कचरा साचलेला दिसून आला. या कचºयात लहान मुले न फुटलेले फटाके शोधताना आढळले.
दुकानांसमोर फटाक्यांचा कचरा
कॉटन मार्केट परिसरातील व्यावसायिकांनी आपल्या प्रतिष्ठानांसमोर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके फोडल्यामुळे फटाक्यांचा कचरा साचला होता. रस्त्याच्या दुतर्फा दुकानांसमोर हा कचरा पडलेला दिसला. काही दुकानदारांनी आज दुकान उघडल्यानंतर दुकानासमोरील कचरा झाडून बाजूला ढीग जमा केला. परंतु हे कचऱ्याचे ढीग तसेच पडून होते.
नंदनवनचा मुख्य रस्ता कचरामय
नंदनवनच्या मुख्य रस्त्यावर सायंकाळपर्यंत फटाक्यांचा कचरा साचलेला होता. या भागातील दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील फटाक्यांचा कचरा दुकानाच्या बाजूला लावलेला होता. सकाळी सफाईसाठी आलेल्या सफाई कामगारांनी कचरा तर झाडला. परंतु तो कचरा त्यांनी बाजूलाच जमा केला. हा कचरा उचलण्यासाठी सायंकाळपर्यंत महानगरपालिकेची गाडी आलेली नव्हती.
डिव्हायडरच्या बाजूला साचला कचरा
सक्करदरा भागातील डिव्हायडरच्या बाजुला कचऱ्याचे ढीग साचलेले दिसले. दुकानदारांनी लक्ष्मीपूजनाला फटाके फोडून हा कचरा डिव्हायडरच्या शेजारी टाकला होता. सायंकाळी उशिरापर्यंत हे कचऱ्याचे ढीग पडून असल्याचे दिसले.
फटाक्यांचा कचरा घातकच
‘फटाक्यांचा कचरा नागरिक, जनावरांसाठी अतिशय घातक आहे. फटाका फुटला तरीसुद्धा त्यात अनेक प्रकारचे घातक केमिकल्स असतात. हे केमिकल्स हवेत किंवा पाण्यात मिसळल्यास ते मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे फटाके फोडणाऱ्यांनीच दुसरा कुणी हा कचरा साफ करेल याची वाट न पाहता नैतिक जबाबदारी स्वीकारून हा कचरा लवकरात लवकर साफ करण्याची गरज आहे.’
एन.आर. अय्यर, प्रकल्प समन्वयक, रमण विज्ञान केंद्र