कळमेश्वरात कोण मारणार मैदान?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:25 AM2021-01-08T04:25:33+5:302021-01-08T04:25:33+5:30
विजय नागपुरे कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात पाच ग्रामपंचायतींपैकी सोनपूर (आदासा) ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यासोबतच सेलू ग्रा.पं.मध्ये एक ...
विजय नागपुरे
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात पाच ग्रामपंचायतींपैकी सोनपूर (आदासा) ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यासोबतच सेलू ग्रा.पं.मध्ये एक उमेदवार बिनविरोध झाल्याने तालुक्यातील चार ग्रा.पं.च्या ३७ जागांसाठी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. यापैकी दोन ग्रामपंचायतमध्ये दुहेरी व दोन ग्रामपंचायतमध्ये तिहेरी लढत होणार आहे.
नऊ सदस्यीय असलेल्या गट ग्रामपंचायत सेलू (गुमथळा) येथे वाॅर्ड क्रमांक २ मधील गीता गायकवाड या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यामुळे येथे काँग्रेस समर्थकांच्या आशा बळावल्या आहेत. तसेच येथील माजी सरपंच चित्रा डोईफोडे, माजी उपसरपंच प्रकाश पांडे हे पुन्हा भाजप समर्थित सेलू (गुमथळा) ग्राम विकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहेत. तसेच गतवेळी काँग्रेस गटाकडून सदस्य म्हणून विजयी झालेले बुद्धराम कटरे यावेळी भाजप समर्थित गटाकडून मैदानात उतरले आहेत. सोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते माजी उपसरपंच अशोक जीवतोडे हे निवडणूक रिंगणाच्या बाहेर असून, गुमथळ्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते वसंत भोयर यांच्या पत्नी भाजपकडून उभ्या असल्याने काँग्रेस गटात फाटाफूट झाल्याचे चित्र आहे. येथे प्रदीप चणकापुरे यांच्याकडे काँग्रेस, तर माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश जीवतोडे यांच्याकडे भाजप समर्थित पॅनेलची धुरा आहे.
सावंगी (तोमर) ग्रामपंचायतीवर गतवेळी काँग्रेसच्या गटाचे वर्चस्व होते. यावेळीही माजी सरपंच, उपसरपंच निवडणूक रिंगणात आहेत. येथे तिहेरी लढत होणार आहे. तीत काँग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडीतून माजी सरपंच प्रज्वल तागडे, माजी सरपंच मीना धरममाळी तसेच माजी सरपंच संजय तभाने यांच्या पत्नी नीता तभाने निवडणूक रिंगणात आहेत. तसेच माजी उपसरपंच मधुकर खांडेकर यांचे ग्रामविकास परिवर्तन पॅनेल असून ते स्वत: निवडणूक रिंगणात आहेत. तसेच याव्यतिरिक्त काँग्रेसचे कार्यकर्ते गुंडेराव हेलोंढे यांनीसुद्धा उमेदवार उभे केले आहेत. हे तीनही पॅनेल काँग्रेस समर्थित असल्याचे बोलले जात आहेत.
तालुक्यात कोहळी (मोहळी) सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. येथे ११ सदस्यांसाठी ३७ उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. येथे भाजप समर्थित संकल्प ग्राम विकास आघाडी, काँग्रेस समर्थित नवनिर्माण ग्रामविकास आघाडी, तर काही ग्रामस्थांनी किसान मजदूर विकास मंच निर्माण करत प्रत्येक गटाने ११ असे ३३ उमेदवार उभे केले आहेत, तर ४ अपक्ष उमेदवार आहेत.
येथे माजी पंचायत समिती उपसभापती संजय चिचखेडे हे काँग्रेसकडून, तर काँग्रेसच्या माजी सरपंच सुनंदा वानखेडे यांचा मुलगा देवकांत वानखेडे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे. येथे भाजप समर्थित आघाडीची धुरा माजी पंचायत समिती सदस्य बेबी धूर्वे, काँग्रेस समर्थित पॅनेलची धुरा पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय चिचखेडे, तर किसान मजदूर विकास मंचची धुरा सामाजिक कार्यकर्ते विजय राजूरकर व विजय ठाकरे यांच्या खांद्यावर आहे. सोनेगाव (पोही) येथे थेट भाजप-काँग्रेस समर्थक गटांमध्ये दुहेरी लढत आहे.
----------
ग्रा.पं. कोहळी (मोहळी)
वार्ड संख्या - ४
सदस्य संख्या - ११
एकूण मतदार - ३२४६
पुरुष मतदार- १६४७
महिला मतदार- १५९९
---
ग्रा.पं. सोनेगाव (पोही)
वार्ड : ३
सदस्य संख्या : ९
एकूण मतदार : १९४४
पुरुष मतदार : १०१५
महिला मतदार : ९२९
---
ग्रा.पं. सेलु (गुमथळा)
वाॅर्ड : ३
सदस्य संख्या : ९
एकूण मतदार : १५११
पुरुष मतदार : ७६२
महिला मतदार : ७४९
ग्रा.पं. सावंगी तोमर
वार्ड : ३
सदस्य संख्या : ९
एकूण मतदार : १६५९
पुरुष मतदार : ८५९
महिला मतदार : ८२०