कामठीत कोण मारणार मैदान?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:13 AM2021-09-16T04:13:24+5:302021-09-16T04:13:24+5:30
जि. प., पं. स. पोटनिवडणुकीच्या लढतीचे चित्र २७ ला होणार स्पष्ट कामठी : कामठी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन जागांकरिता ...
जि. प., पं. स. पोटनिवडणुकीच्या लढतीचे चित्र २७ ला होणार स्पष्ट
कामठी : कामठी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन जागांकरिता १५ तर पंचायत समितीच्या दोन जागांकरिता ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या गुमथळा, वडोदा जिल्हा परिषद सर्कल व बिडगाव, महालगाव पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने उमेदवार मैदान उतरविण्यात आले आहेत.
जि. प. व पं. स.च्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी यापूर्वी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी (दि. ५ जुलैला) निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे २४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. यानुसार ६ जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी करून वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९ जुलैला ही निवडणूक कोविड संक्रमणामुळे रद्द करण्यात आली होती. आता सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत आहे.
गुमथळा जिल्हा परिषद सर्कलसाठी सर्वसाधारण प्रवर्गातून ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात काँग्रेसचे दिनेश ढोले, अनंता वाघ यांनी तर भाजपकडून योगेश डाफ, कैलाश महल्ले, अनिल निधान यांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून खुशाल डाफ, तसेच आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाकडून ॲड. विष्णू पानतावणे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले.
वडोदा जिल्हा परिषद सर्कलसाठी ७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात प्रहार जनशक्ती पक्षाकडून सोनम छत्रपाल करडभाजने, भाजपकडून अनिता रमेश चिकटे, बहुजन रिपब्लिकन एकता मंचाकडून शिल्पा अमोल भिवगडे, काँग्रेसकडून अवंतिका लेकुरवाळे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रुखमा खेडकर, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मीना रामटेके तर पक्ष उमेदवार म्हणून सुकेशिनी गुरुदेव यांनी उमेदवारी अर्ज सादर केले.
बिडगाव पंचायत समिती गणात भाजपच्या वतीने प्रमोद कातुरे, काँग्रेसच्या वतीने आशिष मल्लेवार, वंचित बहुजन आघाडीच्या मृणाली अनिल जामगडे, शिवसेनेचे कपूर चांभारे तर अपक्ष म्हणून अजित विनायक जामगडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले.
महालगाव पंचायत समिती गणात ४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात काँग्रेसकडून सोनू कुथे, भाजपच्या वंदना हटवार, वंचित बहुजन आघाडीच्या यशोदा वर्मा व तर अपक्ष प्रतिमा ठाकरे यांचा समावेश आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज दाखल केलेल्या सर्वच उमेदवारांची यादी २१ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. २७ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.