कामठी बाजार समितीत कोण मारणार मैदान?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:12 AM2021-09-10T04:12:55+5:302021-09-10T04:12:55+5:30
कामठी : बहुप्रतिक्षीत असलेल्या कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ९ ऑक्टोबरला होणार आहे. याकरिता अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली ...
कामठी : बहुप्रतिक्षीत असलेल्या कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ९ ऑक्टोबरला होणार आहे. याकरिता अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून २००६ मध्ये कामठी व हिंगणा बाजार समितीची निर्मिती करण्यात आली होती. त्यादरम्यान राज्य शासनाने प्रशासक म्हणून तालुका सहायक निबंधक पी.बी.पाटील यांची नियुक्ती केली. १५ जुलै २०१२ ला झालेल्या निवडणुकीत हुकूमचंद आमधरे यांची सभापतिपदी तर प्रमोद बाबा महल्ले पाटील हे उपसभापतिपदी विजयी झाले होते. पाच वर्षानंतर २०१७ मध्ये निवडणूक होणार होती. मात्र निवडणुका लांबल्यामुळे सभापती, उपसभापती यांना नऊ वर्षे संधी मिळाली. या काळात कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीत बऱ्याच सुधारणा झाल्या. आता बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्याकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे. १८ संचालकाकरिता निवडणूक होणार असून व्यापारी अडते मतदारसंघातून दोन संचालकाची निवड होईल. त्याकरिता ८९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मापारी हमाल मतदार संघातून एका संचालकाची निवड केली जाईल. त्याकरिता ५ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. सेवा सहकारी मतदारसंघातून ११ संचालकाची निवड केली जाईल. त्याकरिता तालुक्यातील ४२१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून ४ संचालकाची निवड होणार असून त्याकरिता ४६७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण १८ संचालकाकरिता एकूण ९८२ मतदार मतदानाच्या हक्क बजावणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपल्या गटाचे सभापती, उपसभापती विराजमान व्हावे याकरिता कॉंग्रेस आणि भाजपाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ६ ते १४ सप्टेंबर पर्यंत सहायक निबंधक सहकारी संस्था,कामठी यांच्या कार्यालयात उमेदवारांना अर्ज सादर करता येतील. १५ सप्टेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी होईल. १६ सप्टेंबरला पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याकरिता १६ ते ३० सप्टेंबर पर्यंतची संधी असेल. १ ऑक्टोबरला निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येईल. ९ ऑक्टोबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. १० ऑक्टोबरला मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येतील, अशी माहिती कामठीचे सहायक निबंधक सहकारी संस्था बी. के. कोसारे यांनी दिली.