नागपूर-रामटेकमध्ये बसपाच्या हत्तीची ‘स्वारी’ कोण करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:17 AM2019-03-18T10:17:06+5:302019-03-18T10:18:25+5:30
नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने आपल्या उमेदवारांची घोषणा अद्याप केलेली नाही.
आनंद डेकाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने आपल्या उमेदवारांची घोषणा अद्याप केलेली नाही. परंतु गेल्या काही निवडणुकांचा आढावा घेता नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभा मतदार संघात बसपाच्या हत्तीची चाल पुढेच राहिली आहे. १९९८ चा अपवाद वगळता १९९१ ते २०१४ च्या निवडणुकांमध्ये बसपाच्या मतांचा आलेख चढतच गेलेला आहे. बसपाचा हत्ती दिवसेंदिस धावतच असल्याचे चित्र आहे. या दोन्ही मतदार संघात वेळेवर व अनपेक्षित उमेदवार देण्याची बसपाची प्रथा राहिली आहे. त्यामुळे यावेळी बसपाच्या हत्तीवर कोण स्वार होतात, याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.
बसपाने मागील काही निवडणुकांमध्ये मुसंडी मारली आहे. नागपुरात १९९१ मध्ये सिद्धार्थ पाटील यांना १२,१२७ मते तर रामटेकमध्ये मा.म. देशमुख १२,३९३ मते मिळाली होती. त्यावेळेस अपक्ष उमेदवांचया तुलनेत ही मते बऱ्यापैकी होती. पुढच्या वेळी बसपा जोर मारेल असे अंदाज बांधले जात असतांना १९९६ मध्ये बसपाची रिपाइसोबत युती झाली. युतीमध्ये नागपूर व रामटेक या दोन्ही जागा रिपाइंसाठी सोडण्यात आल्या. विशेष म्हणजे या निवडणुकीत रिपाइंने भरभरून मते घेतली. १९९८ मते रिपाइं पुन्हा स्वबळावर लढली. या निवडणुकीत बसपाची मते दुप्पट झाली. नागपुरात सिद्धार्थ पाटील यांना २१,३६२ मते तर रामटेकमधून राम हेडाऊ यांना ३०,९४९ मते मिळाली. १९९९ मध्ये रिपाइंने काँग्रेसशी ‘हात’ मिळवला. तर बसपा स्वतंत्ररीत्या लढली. १९९८ च्या तुलनेत बसपाला जवळपास निम्मीच मते मिळाली. नागपुरात पी.एस. चंगोले यांना १४,४६५ तर रामटेकमध्ये अशोक इंगळे यांना १६,७०६ मते मिळाली. कमी झालेली मते हा बसपासाठी फटका होता. पुढील पाच वर्षे बसपाचे कॅडर कामाला लागले. उमेदवारीचे निकषही बदलवले गेले. २००४ मध्ये नागपुरातून जयंत दळवी तर रामटेकमधून प्रा. चंदनसिंग रोटेले रिंगणात उतरले. दोन्ही मतदारसंघात बसपाच्या उमेदवारंनी ५० हजार मतांचा पल्ला गाठला. दळवी यांना ५७, ०२७ मते तर रोटेले यांना ५५,४४२ मते मिळाली.
२००९ च्या निवडणुकीत बसपाने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला. तेली समाजात प्रस्थ असलेल्या भाजप नेते माणिकराव वैद्य यांना उमेदवारी दिली. यावेळी बसपाने पहिल्यांदा एक लाखाचा पल्ला गाठला. वैद्य यांना १ लाख १८ हजार ७४१ मते मिळाली व बसपा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली. रामटेकमधून प्रकाश टेंभुर्णे रिंगणात होते. फारसे परिचित नसतांनाही टेंभुर्णे यांनी ६२,२३८ मतांवर मजल मारली होती.
तर २०१४ च्या निवडणुकीत नागपुरातून बसपाने डॉ. मोहन गायकवाड यांना रिंगणात उतरवले तर किरण रोडगे-पाटणकर रामटेकमधून लढल्या. यावेळी गायकवाड यांनी ९६,४३३ तर पाटणकर यांनी ९५,०५१ मते घेतली. गेल्या निवडणुकीपेक्षा नागपुरात मिळालेल्या मतांमध्ये कमी आली असेल तर रामटेकमध्ये मात्र आलेख वाढलेलाच होता. तसेच तिसरा क्रमांकही कायम होता. पाटणकर यंदा वंचित बहुजन आघाडीतर्फे रामटेकमधून लढत आहेत. तेव्हा या निवडणुकीत बसपाच्या हत्तीची स्वारी कोण करणार याकडे लक्ष लागले आहे.