कोरोनाच्या प्रकोपात सामान्य मृतदेहांना कोण खांदा देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:07 AM2021-04-27T04:07:56+5:302021-04-27T04:07:56+5:30
- आम्ही खांदेकरी : विजय लिमये यांच्या पुढाकाराने पार पाडले जात आहेत अंत्यविधी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सर्वत्र ...
- आम्ही खांदेकरी : विजय लिमये यांच्या पुढाकाराने पार पाडले जात आहेत अंत्यविधी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वत्र कोरोना संक्रमणाचा हाहाकार माजला आहे. संक्रमणाची धास्ती इतकी की, निधनाची वार्ता जणू अस्पृश्य विषय ठरत आहे. कोविड मृतदेहाची विल्हेवाट शासन-प्रशासनाकडून लावली जात आहे. मात्र, नॉन कोविड पार्थिवांना आधार देणारे चार खांदे डगमगले आहेत. अशा स्थितीत स्मशानघाटापर्यंतचा प्रवास कुटुंबीयांना अत्यंत कठीण जात आहे. अशांच्या अंतिम प्रवासाचे खांदेकरी कोण, हा प्रश्न उपस्थित होत असतानाच पर्यावरणतज्ज्ञ विजय लिमये धावून आले आहेत. कोणी नसेल तर आम्हीच खांदेकरी, अशी घोषणा करत नॉन कोविड पार्थिवांचा अंतिम प्रवासाचा संपूर्ण विधी ते पार पाडत आहेत.
गेल्या महिनाभरापासून दररोज शंभरच्या वरखाली कोविड मृत्यूंचे आकडे आहेत. ज्या शहरात विविध घाटांवर ५०च्या आसपास दररोज अंत्यविधी पार पाडले जात होते, त्या शहरातील घाटांना दररोज कोविड डेथ बॉडीजसह इतर पार्थिवांचे १५०च्या वर अंत्यसंस्कार बघावे लागत आहेत. संक्रमणामुळे अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्यांच्या उपस्थितीलाही निर्बंध आहेत. अशा स्थितीत लांबचा तर सोडाच जवळचा आणि शेजारच्याच्या अंत्यविधीलाही जाणे लोक टाळत आहेत. काय माहीत कोण, कुठून कोरोना देऊन जाईल, ही भीती प्रत्येकाच्याच मनात निर्माण झाली आहे. गल्लीबोळात चार खांदे आधाराला याही काळात मिळत आहेत. मात्र, उच्चभ्रूंच्या वस्तीत बघायलाही कोणी नाही, अशी स्थिती आहे. प्रत्येक कुटुंबाच्या व्यवस्थापनात मृत्यूचे नियोजन कधीच नसते. त्यामुळे निधन कोणाच्याही घरी असो, अंत्यसंस्कार प्रक्रिया ही प्रत्येक वेळी नवीच असते. अशा स्थितीत पर्यावरणतज्ज्ञ विजय लिमये यांनी खांद्यांचा आधार देऊ केला आहे. नैसर्गिक मृत्यू झालेल्या पार्थिवाच्या अंत्यविधीकरिता ते ही सेवा पुरवित आहेत. घरापासून गाडीपर्यंत, गाडीतून स्मशानघाट-विसावा आणि विसाव्यापासून ते ओट्यापर्यंत या सगळ्या विधी पार पाडण्यासोबतच चिताग्नीसाठी पर्यावरणपूरक अशा गोकाष्ठ किंवा मोक्षकाष्ठांचा वापर ते करत आहेत. यामुळे आप्तांचे अंत्यसंस्कार नीट पार पाडले जात असल्याचे समाधान मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना लाभते आहे.
--------------
पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचे प्रणेते
पर्यावरणतज्ज्ञ विजय लिमये यांची ओळख पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचे प्रणेते अशी आहे. विविध शहरात जाऊन ते पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचे मार्गदर्शन करतात आणि प्रत्यक्ष शिकवितातही. कोरोनाच्या पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेतही ते हे काम करत आहेत.
---------------
गोकाष्ठ, मोक्षकाष्ठाचा वापर
अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी शेतातील तुराटी किंवा टाकाऊ कचऱ्यापासून ते मोक्षकाष्ठ तयार करतात. यासाठी शेतकऱ्यांकडून हा कचरा विकत घेतात तर गोकाष्ठ गाई-म्हशीच्या शेणाच्या गोवऱ्यांपासून तयार करतात. अशा तऱ्हेने वृक्षतोडीला त्यांनी लगाम लावला आहे.
-----------
एकट्या एप्रिलमध्ये १२०० अंत्यसंस्कार
कोरोना संक्रमणाच्या २०२०-२१च्या दोन्ही लाटेत आतापर्यंत लिमये यांनी ५०४० पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार पार पाडले आहेत. त्यात कोविड डेथ बॉडींचा मोठ्या संख्येने समावेश आहे. एकट्या एप्रिलमध्येच १२००च्या वर अंत्यसंस्कार त्यांनी पर्यावरणपूरक पार पाडले आहेत. विशेष म्हणजे, हा महिना अजून पूर्ण व्हायचा आहे. त्यांच्यातर्फे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.
--------------
शनिवारी पुण्याहून एक फोन आला होता. नागपुरात एका अंत्यसंस्काराला कोेणीच मिळत नाहीत, तेव्हा तुम्ही मदत करू शकता का, असा सवाल होता. मी तत्काळ हो म्हटले आणि चार खांदेकरींची व्यवस्था करून प्रक्रिया पार पाडली. तेव्हापासून ज्यांना कुणाला अडचण येत असेल त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
- विजय लिमये, पर्यावरणवादी कार्यकर्ते : इको फ्रेण्डली लिव्हिंग फाऊंडेशन
.................