या मस्तवालांना कोण रोखणार ? देशभक्तीच्या नावाखाली रस्त्यावर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:14 AM2019-08-17T01:14:21+5:302019-08-17T01:15:05+5:30
देशभक्तीच्या नावाखाली रस्त्यावर आरडाओरड करून, वेडीवाकडी वाहने चालवित काही मस्तवाल दुचाक्या चालकांनी शहरातील विविध भागात हैदोस घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभक्तीच्या नावाखाली रस्त्यावर आरडाओरड करून, वेडीवाकडी वाहने चालवित काही मस्तवाल दुचाक्या चालकांनी शहरातील विविध भागात हैदोस घातला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शहरात कडक पोलीस बंदोबस्त असूनही या मस्तवाल समाजकंटकांनी गोंधळ घातल्याने सर्वसामान्य नागरिक संताप व्यक्त करीत होते. त्यांचा बेदरकारपणा पाहून ‘या मस्तवालांना कोण रोखणार,’ असा संतप्त सवालही उपस्थित केला जात होता.
गणतंत्र दिन, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासूनच उपराजधानीत दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे आनंदोत्सव साजरा केला जातो. चौकाचौकात तोरणे पताका लावून, ठिकठिकाणी स्वच्छता करून ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते. काही वर्षांपासून देशभक्तीच्या नावाआड काही मस्तवाल तरुणांचे टोळके सायलेंसर काढलेल्या दुचाक्या घेऊन मोठमोठ्याने आवाज करीत, घोषणाबाजी करीत टवाळक्या करीत फिरतात. हे भामटे बेदरकारपणे झिगझ्यागपद्धतीने, वेडेवाकडे वळण घेत दुचाक्या चालवितात. रस्त्याने मुली, महिला जाताना पाहून त्यांना जास्तच चेव येतो. ते एक्सीलेटर वाढवून, दुचाक्यातून फटाके फोडून घोषणाबाजी करतात. रस्त्याने जाणाऱ्या - येणाऱ्यांना कट मारतात. वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना वाकुल्या दाखविल्यासारखे करतात. पोलीस दिसले की तेवढ्या वेळेपुरते ते ठिकठाक राहतात. नंतर त्यांचा पुन्हा हैदोस सुरू होतो. गुरुवारी सकाळपासूनच अनेक भागात त्यांचा हा हैदोस सुरू होता. पावसाचे दिवस असल्यामुळे जागोजागी पाण्याचे डबके साचले होते. अशात स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांच्या जवळून जाऊन त्यांच्यावर चिखल उडविण्याचाही या समाजकंटकांनी प्रयत्न केला. शहरातील विविध भागात हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता. या मस्तवालांना कोण रोखणार, असा संतप्त सवालही या निमित्ताने उपस्थित झाला होता.
८७५ वाहनचालकांवर कारवाई
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम राबविली. दारुबंदी कायद्यानुसार पोलिसांनी ५५ जणांवर तसेच वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ८७५ वाहनचालकांवर कारवाई केली.