या दिव्यांंग वृद्धाला ‘आधार’ देणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:49 AM2018-03-05T11:49:09+5:302018-03-05T11:57:56+5:30
रामटेक येथील ७० वर्षीय मोतीराम येसनसुरे यांच्या डाव्या हाताला बोटं नाहीत. त्यामुळे त्यांना आधार कार्ड मिळाले नाही. परिणामी, बँक अधिकाऱ्यांनी त्यांचे बँक खाते बंद केले. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
कैलास निघोट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शासनाने बँक खात्यापासून तर विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अनिवार्य केले आहे. आधार कार्ड काढण्यासाठी दोन्ही हाताचे ठसे आवश्यक आहेत. मात्र, मुसेवाडी (ता. रामटेक) येथील ७० वर्षीय मोतीराम येसनसुरे यांच्या डाव्या हाताला बोटं नाहीत. त्यामुळे त्यांना आधार कार्ड मिळाले नाही. परिणामी, बँक अधिकाऱ्यांनी त्यांचे बँक खाते बंद केले. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता ते पुन्हा आधार कार्ड काढण्यासाठी शासकीय कार्यालयाचे खेटे घालत आहेत. एकीकडे, वृद्धाच्या हाताला बोटे नाही तर दुसरीकडे, प्रशासन नियमावर बोट ठेवत आहे. त्यामुळे यात दोषी तरी कुणाला ठरवायचे?
मोतीराम येसनसुरे हे आदिवासीबहुल असलेल्या मुसेवाडी येथील रहिवासी होत. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. ते जन्मत: अपंग असून, त्यांच्या डाव्या हाताला केवळ अंगठ्याच्या आकाराचे एकच बोट आहे. मध्यंतरी शासनाने नागरिकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम सुरू केली होती. मुसेवाडी येथेही आधार कार्ड शिबिर आयोजित केले होते. येसनसुरे या शिबिरात आधार कार्ड काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या एका हाताला बोटे नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली. कारण आधार कार्ड काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाण्ो त्यांच्या दोन्ही हाताचे ठसे हवे होते.
कालांतराने शासनाने आधार प्रत्येक बाबीसाठी अनिवार्य केले. बँक खात्यालाही आधार क्रमांक लिंक करणे अनिवार्य करण्यात आले. येसनसुरे यांच्याकडे आधार क्रमांक नसल्याने ते त्यांच्या बँक खात्याला लिंक करणार तरी काय? आधार क्रमांक लिंक न केल्याने बँक अधिकाऱ्यांनी त्यांचे बँक खाते बंद केले. त्यामुळे त्यांच्यासमोर नवीन समस्या निर्माण झाली. यासाठी ते सतत तालुक्याच्या ठिकाणाच्या (रामटेक) चकरा मारत आहेत. ते रोजमजुरीवर उपजीविका करीत असल्याने प्रवासावर खर्च करणार तरी किती, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. मात्र, ही बाब गांभीर्याने घेऊन तोडगा काढण्यास प्रशासन तयार नाही.
मदतीला धावून आले ‘देवा’
मोतीराम येसनसुरे हे आजवर एकाकी संघर्ष करीत होते. उतारवय आणि अपंगत्व असल्याने त्यांना अडचणी येतात. त्यांची ही समस्या कळताच मुसेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य देवा डोंगरे हे त्यांच्या मदतीला धावून आले. आपण मोतीराम येसनसुरे यांना त्यांचे आधार कार्ड व क्रमांक मिळवून देऊ, असा विश्वासही देवा डोंगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
यात माझा दोष काय?
माझी सर्व कामे एकट्या आधार क्रमांकामुळे अडलेली आहेत. आधार क्रमांक नसल्याने माझे बँक खातेही बंद करण्यात आले. माझ्या डाव्या हाताला जन्मत: बोटं नाही, यात माझा दोष कोणता?
- मोतीराम येसनसुरे, पीडित नागरिक.