मातीला देवत्व देणाऱ्या मूर्तिकारांना कोण देणार आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:36 AM2020-05-21T09:36:31+5:302020-05-21T09:39:21+5:30
दिवसरात्र मेहनत करून शहरातील मूर्तीकार मातीतून अक्षरश: देवत्व निर्माण करत असतात. परंतु कोरोनामुळे मूर्तिकारांनादेखील मोठा धक्का बसला आहे.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामनवमी, हनुमान जयंतीच्या दिवशी नागपुरात निघणाऱ्या शोभायात्रांची देशभरात चर्चा होते. या शोभायात्रांमधील विविध मूर्ती या आकर्षणाचे केंद्र असतात. दिवसरात्र मेहनत करून शहरातील मूर्तीकार मातीतून अक्षरश: देवत्व निर्माण करत असतात. परंतु कोरोनामुळे मूर्तिकारांनादेखील मोठा धक्का बसला आहे. अगोदरच्या कामांचे पैसे व गणेशोत्सवाची तयारी दोन्ही गोष्टी अडकून पडल्या असल्यामुळे शेकडो मूर्तिकारांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. दैनंदिन गरजा भागवतानाच नाकी नऊ येत असताना गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी पैसे कसे जमवायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
महाल, सक्करदरा भागात प्रामुख्याने मूर्तिकार राहतात. अनेकांकडे तर पिढ्यान्पिढ्या हाच व्यवसाय सुरू आहे. मूर्तिकला हेच त्यांचे सर्वस्व असून सार्वजनिक उत्सवांदरम्यानच त्यांना मिळकत होत असते. रामनवमी व हनुमान जयंतीसाठी अनेक मूर्तिकारांनी मूर्ती बनविल्या होत्या. अनेकांची तयारी तर अंतिम टप्प्यात आली होती. मात्र कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित झाला आणि शहरासह विदर्भातील शोभायात्रा रद्द झाल्या. परिणामी त्या मूर्ती अद्यापही तशाच पडून आहेत. अनेकांनी उधार घेऊन मूर्ती बनविल्या होत्या. परंतु लॉकडाऊनमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
दुसरीकडे उन्हाळ्यात गणेशोत्सवाची तयारी सुरू होते. बाहेरील गावातून माती आणणे, कच्चा माल आणून ठेवणे ही कामे उन्हाळ्यात होतात. प्रामुख्याने मध्य प्रदेश, भंडारा, छिंदवाडा, यवतमाळ, गोंदिया, काटोल यांसारख्या ठिकाणांहून मूर्तींसाठी लागणारी माती आयात करावी लागते. परंतु लॉकडाऊनमुळे यंदा माती आणणेदेखील शक्य झालेले नाही. अनेकांची दुकाने भाड्याने आहेत. त्यांना दर महिन्याचे भाडे देणेदेखील शक्य होणार नसल्याचे चित्र आहे.
अद्याप नवीन ऑर्डर्स नाहीत
अद्यापही कोरोनाचा प्रकोप संपलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव किती प्रमाणात होणार, हेदेखील अद्याप स्पष्ट नाही. मोठ्या सार्वजनिक मंडळांकडून अद्याप नवीन ऑर्डर्स आलेल्या नाहीत. त्यामुळे मूर्तिकारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी मदत करावी
आर्थिक अडचणीत सापडलेल्या मूर्तिकारांनी सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज संस्थेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. विदर्भातील मूर्तिकारांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. लॉकडाऊनमुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी, तसेच गणेशमूर्तींसाठी माती आणण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली असल्याचे संस्थेचे कोषाध्यक्ष मनोज बिंड यांनी सांगितले.