पावसाळ्यात भेसळ करणाऱ्यांवर कोण कारवाई करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:51+5:302021-07-23T04:06:51+5:30
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागात (एफडीए) सहआयुक्त व शहर सहायक आयुक्तांचे पद रिक्त असल्याने कार्यरत अधिकाऱ्यांवर कुणाचाच ...
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागात (एफडीए) सहआयुक्त व शहर सहायक आयुक्तांचे पद रिक्त असल्याने कार्यरत अधिकाऱ्यांवर कुणाचाच धाक राहिला नाही. पावसाळ्यात आणि कोरोना काळात अन्नपदार्थातील भेसळीमुळे आजाराला आमंत्रण देण्याची जास्त शक्यता असून वरिष्ठ अधिकाऱ्यांअभावी भेसळ करणाऱ्यांवर कोण कारवाई करणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याबाबतीत एफडीए गंभीर नसल्याचे यावरून दिसून येते.
सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार ३० मार्च २०२० ला आणि सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे ३० ऑगस्ट २०१९ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर शासनाने नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती अद्यापही न केल्याने विभागाकडून भेसळीच्या कारवाया थांबल्या आहेत. त्यामुळेच विभागाला दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यास अधिकारी अकार्यक्षम ठरले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतरच भेसळ करणाऱ्यांवर धडक कारवाई होऊ शकते.
नागपूर जिल्ह्यासाठी अपुरा स्टॉफ
३५ लाख लोकसंख्येच्या नागपूर जिल्ह्यासाठी एक सहायक आयुक्त व दहा अन्न सुरक्षा अधिकारी असल्यामुळे अन्न पदार्थ असो वा खाद्यतेलातील भेसळ आणि तंबाखूविरोधी धडक कारवाया होत नाहीत. बाजारात भेसळीचा धंदा फोफावला आहे. सहआयुक्त चंद्रकांत पवार यांनी मार्चपूर्वी खाद्यतेलात भेसळ करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला होता. अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्याला अन्न पदार्थांचे नमुने एकत्रित करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे लक्ष्य दिले जाते. माहितीनुसार यावर्षी १ एप्रिल ते २० मेपर्यंत जिल्ह्यातून अन्न पदार्थांचे केवळ १७ सॅम्पल घेतले, तर जिल्ह्याचे टार्गेट ८० सॅम्पलचे होते. नागपूर विभागांतर्गत या काळात टार्गेट १७६ चे असताना केवळ ५५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. वर्धा जिल्ह्यात २४ चे टार्गेट असताना केवळ एक सॅम्पल घेण्यात आले. एवढेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यात धाडीदरम्यान केवळ २८.८१ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला तर भंडारा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली येथून काहीही माल जप्त करण्यात आलेला नाही. यावरून विभागाचे अधिकारी लोकांच्या आरोग्याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येते.
कोरोना काळात अधिकाऱ्यांची अन्य विभागात नियुक्ती
अधिकारी म्हणाले, यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात काम देण्यात आले होते. शिवाय काही बाजारपेठा बंद तर काहींवर वेळेचे निर्बंध असल्यामुळे अन्न पदार्थांचे सॅम्पल घेता आले नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विभागाला टार्गेट पूर्ण करता आले नाही.
१ एप्रिलपासून सहआयुक्तांचे पद रिक्त
अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागेवर दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. याशिवाय सहायक आयुक्त (अन्न) या पदावरून मिलिंद देशपांडे ३० ऑगस्ट २०१९ ला सेवानिवृत्त झाले. या दोन्ही पदाचा कार्यभार सहायक आयुक्त (ग्रामीण, अन्न) शरद कोलते सांभाळत आहेत. वरिष्ठ अधिकारी नसल्याने त्यांच्यावरही मर्यादा आल्या आहेत.