नक्षच्या मृत्यूची जबाबदारी घेणार काेण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:04+5:302021-07-10T04:08:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : वेकाेलिच्या सिल्लेवाडा काेळसा खाणीच्या प्रतिबंधित क्षेत्रातील रेतीच्या उंच ढिगाऱ्यावर खेळताना नक्ष चंद्रपाल साेनेकर (९, ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : वेकाेलिच्या सिल्लेवाडा काेळसा खाणीच्या प्रतिबंधित क्षेत्रातील रेतीच्या उंच ढिगाऱ्यावर खेळताना नक्ष चंद्रपाल साेनेकर (९, रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर) याचा वर असलेल्या विजेच्या हायव्हाेल्टेज तारेला स्पर्श झाला आणि विजेच्या धक्क्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ६) सायंकाळी घडली. महावितरण कंपनीने या घटनेला वेकाेलि प्रशासनाला जबाबदार धरले असून, खापरखेडा पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वेकाेलि प्रशासनाने मात्र यावर काहीही हालचाली केल्या नाहीत.
यासंदर्भात महावितरण कंपनीने घटनास्थळाचा पंचनामा केला. वेकाेलिने हायव्हाेल्टेज विद्युत तारेच्या खाली तसेच तारेला चिटकून व त्यापेक्षा उंच रेतीचे ढिगारे ठेवले आहेत. हा रेतीसाठा अवैध आहे, अशी धक्कादायक माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पंचनाम्यात नमूद केल्या आहेत. याला महावितरणचे सहायक अभियंता अनिल बमनाेटे यांनी दुजाेरा दिला असून, आपण खापरखेडा पाेलीस ठाण्यात लेखी तक्रार दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नक्षच्या मृत्यूस वेकलि प्रशासन जबाबदार असून, सब एरिया मॅनेजर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात दिली आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराबाबत वेकाेलि प्रशासनाने काही लाेकप्रतिनिधी व कामगार संघटनांचे पदाधिकारी यांना हाताशी धरून प्रकरण शांत करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...
बेघर करण्याची धमकी
नक्ष हा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक हाेता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे सिल्लेवाडा, पाेटा येथे हळहळ व्यक्त हाेत आहे. परंतु, वेकाेलि अधिकाऱ्यांनी अद्यापही त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही. काही लाेकांना त्याच्या घरी पाठवून आईवडिलांना भीती दाखविण्याचे व धमकाविण्याचे प्रकार सुरू आहे. त्यांना बेघर करण्याची धमकी दिली जात आहे. वेकाेलिने अद्यापही त्यांचे प्रतिबंधित क्षेत्र सील केले नाही.