भिवापुरात आवाज कुणाचा? पारवे विरुद्ध पारवे रंगणार सामना
By जितेंद्र ढवळे | Published: October 6, 2023 04:18 PM2023-10-06T16:18:35+5:302023-10-06T16:19:57+5:30
३६ ग्रा. पं.साठी राजकीय मोर्चेबांधणी
नागपूर :नागपूर जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. यात जिल्ह्यात शेवटच्या टोकावरील भिवापूर तालुक्यातील ५६ पैकी ३६ ग्रा. पं.च्या निवडणुका होत आहेत. यावेळी भिवापुरात कोण मैदान मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणुका ग्रा. पं.च्या होत असल्या तरी आगामी नगरपंचायत, नगर परिषद आणि लोकसभा निवडणुका विचारात घेता सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपले सर्वाधिक सरपंच निवडून यावे यासाठी ताकद लावणार आहेत.
उमरेड विधानसभा क्षेत्रात मोडणाऱ्या भिवापूर तालुक्यात याही वेळी बहुतांश ग्रा. पं.मध्ये भाजपविरुद्ध कॉंग्रेस असाच सामना होईल. या दृष्टीने दोन्ही पक्षांकडून सरपंच पदाच्या उमेदवारांची गुरुवारपासून चाचपणी सुरू झाली आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ताब्यातील उमरेड मतदारसंघ हिसकावून घेत कॉंग्रेसचे राजू पारवे यांनी बाजी मारली होती. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गत साडे तीन वर्षांत भाजपचे सुधीर पारवे यांनी पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. मात्र या मतदारसंघातील भिवापूर आणि कुही बाजार समित्यांच्या निवडणुकीत कॉंग्रेसने दमदार यश मिळवित सत्ता स्थापन केली.
उमरेड बाजार समितीच्या निवडणुकीतही कॉंग्रेस-भाजपमध्ये काट्याची टक्कर झाली. यात भाजपचे १२, तर कॉंग्रेसचे सहा संचालक विजयी झाले. सध्या ही बाजार समिती भाजपच्या ताब्यात आहे. भिवापूर राजू पारवे आणि सुधीर पारवे यांचे होम टाऊन असल्याने तालुक्यातील ग्रा. पं. निवडणुकीत आपल्या पक्षाला यश मिळवून देण्यासाठी दोघेही मैदानात उतरले आहेत. यावेळी रामटेक लोकसभेचा उमेदवार उमरेड मतदार संघातून राहील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यात भाजपचे माजी आ. सुधीर पारवे आणि कॉंग्रेसचे आमदार राजू पारवे यांची नावे चर्चेत आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीत ही जागा कुणाला जाते, यानंतरच उमेदवार निश्चित होतील.
सध्या शिवसनेचे कृपाल तुमाने येथे खासदार आहेत. शिवसेनेतील बंडानंतर तुमाने एकनाथ शिंदे गटात गेले. त्यामुळे भिवापूर तालुक्यात यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाची किती ताकद आहे, हेही ग्रा. पं. निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट होईल. गत दोन वर्षांपासून उद्योजक प्रमोद घरडे हेही त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून भिवापूरच्या राजकारणात सक्रीय आहेत. ग्रा. पं. निवडणुकीत ते कुणाला साथ देतात, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.
येथे आहेत निवडणुका
भिवापूर तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक तर दोन ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक होत आहे. यात झमकोली, मालेवाडा, चिखली, सालेशहरी, झिलबोडी, उखळी, पाहमी, शिवनफळ, मेढा, तास, धापर्ला (डोये), सालेभट्टी (चोर), शिवापूर, जवराबोडी, विरखंडी, मांडवा (सोम.), जवळी, भागेबोरी, मांडवा (लभान), वाकेश्वर, वासी, नांद, धामनगाव (वि.मं.), भगवानपूर, नक्षी, वडध, बोटेझरी, भिवी, सालेभट्टी (दंदे), पिरावा, कवडसी (बरड), धामनगाव (गवळी), नवेगाव (देश.), मानोरा, सेलोटी, महालगाव येथे सार्वत्रिक तर मरूपार व पांजरेपार या दोन ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.