राष्ट्रवादीकडून सभापतिपदाची लॉटरी कुणाला? बंग, जोध, नागपुरे यांच्यात रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 07:04 PM2022-10-27T19:04:28+5:302022-10-27T19:05:07+5:30
Nagpur News जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये पोलिटिकल ड्रामा पाहायला मिळाल्यानंतर आता १ नोव्हेंबर रोजी सभापतिपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
नागपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये पोलिटिकल ड्रामा पाहायला मिळाल्यानंतर आता १ नोव्हेंबर रोजी सभापतिपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एक सभापतिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या पदावर दिनेश बंग (रायपूर), प्रवीण जोध (भिष्णुर) की वृंदा नागपुरे (बोरखेडी) यापैकी कुणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागले आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांशी झालेल्या वाटाघाटीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोन पदांची मागणी केली होती. मात्र, तूर्तास राष्ट्रवादीचे एका सभापतिपदावर सेटलमेंट होण्याची चिन्हे आहेत. या पदासाठी माजी मंत्री रमेश बंग यांचे पुत्र दिनेश बंग, माजी मंत्री अनिल देशमुख यांचे खंदे समर्थक असलेले प्रवीण जोध यांची नावे आघाडीवर आहेत. रमेश बंग यांनी गेल्यावेळी पक्षादेश मानत हिंगणा विधानसभेचा दावा सोडत माजी आमदार विजय घोडमारे यांना संधी दिली होती. त्यामुळे यावेळी मुलगा दिनेश यांना सभापती करून राजकीय पकड मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सलील देशमुख हे स्वत: सभापतिपद स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, ते त्यांच्या गोटातील सदस्याला पद मिळवून देण्यासाठी आग्रही आहेत. गेल्यावेळी उज्ज्वला बोढारे यांच्या रूपात राष्ट्रवादीने हिंगणा मतदारसंघात महिला बालकल्याण सभापतिपद दिले होते. त्यामुळे यावेळी सभापतिपद काटोल विधानसभेत द्यावे, अशी भूमिका जि.प. सदस्य सलील देशमुख यांनी घेतली आहे.
जि.प. सदस्य वृंदा नागपुरे (बोरखेडी) या कळमना बाजार समितीचे उपसभापती प्रकाश नागपुरे यांच्या पत्नी आहेत. नागपुरे यांची माजी मंत्री सुनील केदार यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे ऐनवेळी बंग-देशमुख वादात नागपुरे यांचा नंबर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सभापतिपद नेमके कुणाला द्यायचे याबाबत अद्याप राष्ट्रवादीच्या नेत्यांची आपसात चर्चा झालेली नाही.
काँग्रेसने राष्ट्रवादीवर सोडला निर्णय
- अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या घरी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कोट्यातील सभापतिपद कुणाला द्यायचे याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घ्यावा, त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली होती. त्यामुळे आता बंग-देशमुख यांना आपसात बसूनच निर्णय घ्यायचा आहे.
राष्ट्रवादीला मतफुटीची धोका
- राष्ट्रवादीचे एकूण ८ सदस्य आहेत. मात्र, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीचे एक मत फुटले होते. मांढळच्या सदस्य मनीषा फेंडर यांनी अध्यक्षपदासाठी काँग्रेसला मतदान केले. तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या उमेदवार कुंदा राऊत यांना मतदान न करता काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नाना कंभाले यांना मतदान केले होते. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तंटबंदी उभारल्यानंतरही फेंडर यांनी विरोधात मतदान करण्याचे धाडस केले होते. त्यामुळे सभापतिपदाच्या निवडणुकीतही मतफुटीचा धोका नाकारता येत नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत मतफुटी होऊ नये याची विशेष काळजी काँग्रेसचे नेते घेत आहेत.