कोण मारणार नागपूर विद्यापीठात बाजी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:09 PM2017-11-24T23:09:29+5:302017-11-24T23:18:01+5:30
तब्बल सात वर्षानंतर शनिवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सिनेट आणि विद्वत् परिषदेसाठी शनिवारी मतदान होत आहे. सिनेटच्या २९, विद्वत् परिषदेच्या ८ आणि ५२ अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी तीन जागांसाठी पाच जिल्ह्यातील ८६ मतदान केंद्रावर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : तब्बल सात वर्षानंतर शनिवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सिनेट आणि विद्वत् परिषदेसाठी शनिवारी मतदान होत आहे. सिनेटच्या २९, विद्वत् परिषदेच्या ८ आणि ५२ अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी तीन जागांसाठी पाच जिल्ह्यातील ८६ मतदान केंद्रावर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल.
तिन्ही प्राधिकरणासाठी एकूण २७२ उमेदवार मैदानात उतरले आहेत. यंदाची विद्यापीठाची निवडणूक प्रत्येक गट स्वबळावर लढतो आहे. यात गतवेळी यंग टीचर्स आणि शिक्षण मंचाला टक्कर देणारा सेक्युलर पॅनेल यावेळी कोंडीत सापडला आहे. कारण या पॅनेलचे सर्वेसर्वा डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांची गांधी विचारधारेतील पदवी निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत आली आहे तर याच गटाचे डॉ. डी.के.अग्रवाल यांचा कॅसचा पदोन्नती घोटाळा पॅनेलसाठी डोकेदुखी ठरतो आहे.
निवडणुकीच्या आधीच काही दिग्गजांनी रामराम केल्याने सेक्युलर पॅनेल एकाकी पडला असला तरी राजकीय मोर्चेबांधणीत हातखंडा असल्याच्या अनुभवावर सेक्युलर मैदानात अजूनही कायम आहे. गतवेळी शिक्षण मंचच्या मांडीला मांडी लावणारे डॉ.बबनराव तायवाडे यांच्या यंग टीचर्स असोसिएशनला शिक्षण मंचचे यंदा कडवे आवाहन आहे. यंग टीचर्स यावेळीही गतवेळी प्रमाणे काही मतदार संघात जोर मारण्याच्या तयारीत आहे.
शिक्षण मंचाची विकास गाडी सध्या माजी प्र-कुलगुरु डॉ.गौरीशंकर पाराशर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने शिक्षण मंचामध्ये सध्या फिलगुड आहे. सिनेट आणि विद्वत् परिषदेचे मैदान मारण्यासाठी त्यांनी चार महिन्यांपासून सेक्युलर पॅनेलला खिंडार लावले आहे. गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात त्यांनी मोठे आॅपरेशन केले आहे. त्यामुळे शिक्षण मंच यावेळी विद्यापीठ निवडणुकीत काही मतदार संघात सेक्युलर आणि यंग टीचर्सला घाम फोडेल, असा राजकीय अंदाज लावला जात आहे. इकडे एकेकाळी विद्यापीठाच्या राजकारणात पॉवरफुल असेल्या ‘नुटा’ने यावेळी कंबर कसली आहे. मात्र कुरघोडीच्या राजकारणात नुटाच्या वाट्याला किती जागा येतात, हे २७ रोजीच निकालानंतर स्पष्ट होईल.